आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी व सुरक्षा साहित्याची मागणी.
अमळनेर | आबिद शेख

अमळनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ च्या नगरसेविका शोभाबाई भिवसन गढरे यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करण्यात यावी तसेच त्यांना आवश्यक सुरक्षा साहित्य तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आरोग्य विभागातील कर्मचारी गटारे, नाले, सार्वजनिक शौचालये, कचरा तसेच इतर अस्वच्छ ठिकाणांची नियमित साफसफाई करत असल्याने त्यांना विविध संसर्गजन्य आजारांचा धोका असतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने वेळोवेळी आरोग्य तपासणी करून आवश्यक उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना रेनकोट, गमबूट, हातमोजे, मास्क आणि संपूर्ण सेफ्टी किट उपलब्ध करून देण्यात यावे, जेणेकरून काम करताना त्यांच्या आरोग्याची सुरक्षितता सुनिश्चित होईल, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
नगरसेविका शोभाबाई गढरे यांनी केलेल्या या मागणीची नगरपरिषद प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
