ऐंशीव्या वर्षातही लेखणीची धार कायम; ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक सुभाष पाटील घोडगावकर यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : खानदेशातील पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात आपल्या स्वतंत्र लेखणीने ठसा उमटविणारे ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि कवी सुभाष पाटील घोडगावकर हे १५ ऑगस्ट रोजी आपल्या आयुष्याच्या ८०व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. पत्रकारिता, साहित्य, आकाशवाणी, सामाजिक चळवळ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी असलेला त्यांचा स्नेहसंबंध असा समृद्ध प्रवास त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी ओळख निर्माण करणारा आहे.

सुभाष पाटील घोडगावकर यांचा जन्म १५ ऑगस्ट १९४७ रोजी घोडगाव, ता. चोपडा, जि. जळगाव येथे झाला. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारिता, लेखन आणि साहित्य क्षेत्राला आपले कार्यक्षेत्र बनविले. सरकारमान्य पत्रकार म्हणून काम करताना त्यांनी लेखक आणि कवी म्हणूनही आपली वेगळी ओळख निर्माण केली. स्वभावाने स्पष्टवक्ते, शिस्तप्रिय, वक्तशीर आणि काहीसे तापट असले तरी अंतःकरणाने अत्यंत संवेदनशील व प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या पत्नी सौ. रेखा सुभाष पाटील यांनी त्यांच्या जीवनप्रवासात मोलाची साथ दिली.


स्नेहबंधातून अधिक दृढ झालेले नाते
सुभाष पाटील यांना अनेकजण प्रेमाने ‘आबा’ म्हणून संबोधतात. त्यांचा स्वभाव बाहेरून कठोर वाटला तरी मनाने ते अत्यंत मृदू आहेत. परिचय वाढत गेला की त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आपुलकी अधिक जाणवते, असा अनुभव त्यांच्या सहवासातील अनेकांना आला आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या एका कार्यक्रमात स्वर्गीय राजेंद्र सुतार यांच्या माध्यमातून त्यांची झालेली भेट पुढे घट्ट मैत्रीत रूपांतरित झाली. कार्यक्रमातील सत्कारानंतर वाढलेला हा स्नेह आजही तितक्याच जिव्हाळ्याने कायम आहे.
शिस्त आणि वक्तशीरपणा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक गुण. आकाशवाणीच्या सेवेत असतानाही कार्यालयीन वेळेचे काटेकोर पालन करणारे सुभाष पाटील आजही एखाद्याला वेळ दिल्यानंतर ठरलेल्या वेळी उपस्थित राहतात, ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विशेष बाब आहे.
पत्रकारितेत दिग्गजांशी संवाद
दीर्घ पत्रकारिता कारकिर्दीत सुभाष पाटील यांनी अनेक नामवंत साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील दिग्गजांच्या भेटी घेतल्या व त्यांच्या मुलाखती घेतल्या. ना. धों. महानोर, शांताराम नांदगावकर, मेधा पाटकर, प्रवीण दवणे, अशोक सोनवणे, दया पवार, प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी, संजीवकुमार सोनवणे, कै. मुमताज रहिमतपुरे आदींसोबत त्यांचा संवाद झाला.
विशेष म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांनी त्यांच्या मंगरूळ येथील निवासस्थानी भेट दिली होती, ही त्यांच्या साहित्यिक प्रवासातील उल्लेखनीय आठवण मानली जाते.
निष्कलंक पत्रकारितेचा आग्रह
आजच्या कॉपी-पेस्टच्या युगापेक्षा पत्रकारितेची मूल्ये वेगळी असलेल्या काळात सुभाष पाटील यांनी पत्रकारिता केली. बातमीसाठी प्रत्यक्ष माहिती मिळविणे, अभ्यास करणे आणि स्वतःच्या लेखणीवर विश्वास ठेवणे, या पद्धतीने त्यांनी पत्रकारितेचा प्रवास केला.
पत्रकाराने कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्कलंक, स्वाभिमानी आणि प्रामाणिक पत्रकारिता करावी, हा त्यांचा कायमचा आग्रह राहिला आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून वाममार्गाने पैसा मिळविण्यापेक्षा आपल्या लेखणीची प्रतिष्ठा जपणे महत्त्वाचे आहे, असा त्यांचा ठाम विचार आहे.
राष्ट्रीय पातळीवरील व्यक्तिमत्त्वांचा सहवास
सुभाष पाटील यांच्या आयुष्यात अनेक मान्यवर व्यक्तींचा सहवास लाभला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कुटुंबाशी संबंधित असलेल्या तसेच सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती निर्मला देशपांडे यांच्यासोबत त्यांनी आठ ते दहा दिवसांचा सहवास अनुभवला आणि त्यांच्या घरी मुक्कामही केला.
‘अंधारातील दिवे’ला राज्य पुरस्कार
दैनिक लोकमतमध्ये त्यांनी काही वर्षे ‘अंधारातील दिवे’ हा लोकप्रिय स्तंभ लिहिला. त्यांच्या या लेखनाला १९९१ मध्ये महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मिळाला. पत्रकारितेसोबत साहित्य क्षेत्रातही त्यांनी आपल्या लेखणीचा ठसा उमटविला.
साहित्य क्षेत्रातील समृद्ध योगदान
सुभाष पाटील यांनी आतापर्यंत नऊ पुस्तकांचे लेखन केले असून त्यातील एका पुस्तकाला महाराष्ट्र शासनाकडून पुरस्कार मिळाला आहे. वसंत वादळ, स्वीकार, ऊन-सावली यांसारख्या कादंबऱ्यांसह पाऊलखुणा, वेदना, कडू-गोड आदी साहित्यकृतींतून त्यांनी आपली साहित्यिक प्रतिभा व्यक्त केली.
१९७५ पासून आकाशवाणी जळगाव, नागपूर आणि मुंबई केंद्रांवरून त्यांचे अडीचशेहून अधिक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, मराठा, सकाळ, लोकमत, गावकरी, देशदूत, जनशक्ती, बातमीदार आदी वृत्तपत्रांमधून त्यांनी सातत्याने लेखन केले.
अभिरुची, किर्लोस्कर, हंस, पैंजण, नवनीत, किशोर, माणूस, सत्यकथा आदी मासिकांत त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या. त्यांनी एक हजाराहून अधिक कविता लिहिल्या असून अनेक वृत्तपत्रांतून स्तंभलेखनही केले आहे.
साहित्य संमेलनांमध्ये सक्रिय सहभाग
सुभाष पाटील यांनी विविध साहित्य संमेलनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. १९८२ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या नवोदित लेखकांसाठी आयोजित शासकीय संमेलनात त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य प्रौढ शिक्षण संस्थेच्या विविध शिबिरांमध्येही त्यांनी सहभाग घेतला.
जळगाव जिल्हा पत्रकार संघाचा सन्मान पुरस्कार त्यांना मिळाला. १९८९ मध्ये त्यांनी चोपडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपद भूषविले, तर २००२ मध्ये जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.
दिग्गज साहित्यिकांचा प्रभाव
त्यांच्या साहित्यिक जडणघडणीत वि. स. खांडेकर, प्रा. ना. सी. फडके, विल्यम शेक्सपियर, कुसुमाग्रज आणि प्रा. श्री. म. माटे यांचा प्रभाव राहिला आहे. या साहित्यिकांच्या लेखनातून मिळालेली प्रेरणा त्यांच्या साहित्यकृतींमध्येही जाणवते.
ज्येष्ठ पत्रकारांच्या मानधनासाठी लेखणीचा लढा
ज्येष्ठ पत्रकारांना महाराष्ट्र शासनाकडून नियमित मानधन मिळावे, यासाठी सुभाष पाटील यांनी लेखणीच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठविला. त्यांच्या प्रयत्नांमुळे ज्येष्ठ पत्रकारांसाठी मानधनाची योजना पुढे आली आणि आज अनेक ज्येष्ठ पत्रकारांना त्याचा लाभ मिळत आहे.
सुमारे २०० ज्येष्ठ साहित्यिकांनाही या योजनेचा लाभ मिळत असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे त्यांना संजय निराधार योजनेतून मिळणारे दरमहा १५०० रुपयांचे मानधन त्यांनी स्वतःहून तहसीलदारांकडे अर्ज करून बंद केले. सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात स्वाभिमानाला त्यांनी दिलेले महत्त्व या कृतीतूनही अधोरेखित होते.
मोठ्या भावाच्या ऋणाची जाणीव
सुभाष पाटील यांच्या कौटुंबिक जीवनात त्यांचे थोरले बंधू स्वर्गीय लिंबा मोतीराम पाटील ऊर्फ प्राचार्य एल. एम. पाटील यांचे विशेष स्थान आहे. त्यांच्या शिक्षणात आणि आयुष्याच्या जडणघडणीत मोठ्या भावाने दिलेल्या योगदानाची जाणीव सुभाष पाटील आजही मनापासून जपतात. चार भावांचे हे कुटुंब असून कुटुंबीयांशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग आहे.
ऐंशीव्या वर्षातही लेखणी तरुण
आठ दशके आयुष्याचा प्रवास करताना पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक बांधिलकी यांचा मेळ साधत सुभाष पाटील घोडगावकर यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. काळ बदलला, पत्रकारितेची साधने बदलली, माध्यमांचे स्वरूप बदलले; मात्र प्रामाणिक लेखणी, स्वाभिमान आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही.
१५ ऑगस्ट रोजी त्यांच्या ८०व्या वर्षात पदार्पणानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! प्रभू परमेश्वर त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर लेखनाची ऊर्जा देवो, हीच प्रार्थना.
“आप जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार!”
— मकसूद बोहरी, अमळनेर

Oplus_131072

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed