अमळनेर मार्गे धुळे–चोपडा प्रवास होणार सुसाट अमळनेर ते धरणगाव फाटा काँक्रिटीकरणासाठी १७२ कोटींचा निधी मंजूर – आ. अनिल पाटील.
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या अमळनेर–गडखांब–पातोंडा–धरणगाव फाटा या मार्गाच्या काँक्रिटीकरणाला शासनाने मंजुरी दिली असून या कामासाठी तब्बल १७२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली.
दीर्घकाळापासून या मार्गाच्या उन्नतीकरणाची मागणी नागरिक आणि वाहनचालकांकडून होत होती. आमदार अनिल पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर या महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे. या कामामुळे अमळनेर, धरणगाव, चोपडा, यावल तसेच धुळे जिल्ह्यातील लाखो नागरिकांना थेट लाभ होणार असून व्यापार, उद्योग आणि कृषी क्षेत्रालाही चालना मिळणार आहे.
गेल्या काही वर्षांत या मार्गावरील वाढती वाहतूक, रस्त्याची झालेली दुरवस्था आणि अपघातांच्या घटनांमुळे काँक्रिटीकरणाची गरज अधोरेखित होत होती. शासन स्तरावर विविध बैठका, निवेदने आणि पाठपुरावा केल्यानंतर अखेर निधी मंजूर झाल्याने या मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित, टिकाऊ आणि वेगवान होणार आहे.
विशेष म्हणजे धरणगाव ते चोपडा या मार्गाचे काम आधीच सुरू असून आता धरणगाव फाटा ते अमळनेर या टप्प्यालाही मंजुरी मिळाल्याने धुळे–अमळनेर–चोपडा हा संपूर्ण प्रवास अधिक सक्षम होणार आहे. तसेच पूर्वी पूर्ण झालेल्या फागणे–अमळनेर रस्त्याच्या रुंदीकरणामुळे धुळे ते अमळनेर संपर्क आणखी मजबूत झाला आहे.
या नव्या काँक्रिटीकरणामुळे यावल, चोपडा, धरणगाव आणि अमळनेर परिसरातील नागरिकांना धुळे शहराशी संपर्क अधिक सुलभ होणार असून पुढे नाशिक, कल्याण आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनाही मोठा फायदा होणार आहे.
कृषी क्षेत्राच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. केळी, कापूस, मका, भाजीपाला आणि इतर शेतमालाची वाहतूक जलद होऊन शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. तसेच औद्योगिक मालवाहतूक आणि व्यावसायिक व्यवहारांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
काँक्रिट रस्त्यांचे आयुष्य डांबरी रस्त्यांच्या तुलनेत अधिक असल्याने वारंवार दुरुस्तीचा खर्च कमी होतो. पावसाळ्यात खड्ड्यांची समस्या कमी होऊन अपघातांनाही आळा बसण्यास मदत होणार आहे.
या मंजुरीबद्दल आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांचे आभार मानले.
