आषाढीवारी २०२६ : वारकऱ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय; जळगाव जिल्ह्यास ₹२.७२ कोटींचा निधी मंजूर.
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – आषाढीवारी २०२६ निमित्त जळगाव जिल्ह्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांसोबत सहभागी होणाऱ्या हजारो वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांना प्रवासादरम्यान आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल रुपये २ कोटी ७२ लाख ८१ हजार ७५ इतक्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
यासंदर्भात ग्रामविकास विभागाने दि. २३ जून २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला असून, हा निधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला आहे.

पालखी मुक्कामस्थळी वारकऱ्यांच्या सोयीसाठी भाडेतत्त्वावर फिरती शौचालये, स्नानगृहे तसेच टँकरद्वारे स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या दृष्टीने ही सुविधा अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
निधीचे वाटप पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे :
• श्री संत मुक्ताई संस्थान, मुक्ताईनगर पालखी – ₹२,०८,९३,०९५
• श्री सद्गुरू सखाराम महाराज विठ्ठल–रुक्मिणी संस्थान, अमळनेर पालखी – ₹२२,८१,४८५
• श्रीराम मंदिर संस्थान, जळगाव पालखी – ₹४१,०६,४९५
शासनाने मंजूर निधीपैकी पहिल्या टप्प्यात १० टक्के म्हणजे सुमारे ₹२७.२८ लाख निधी जिल्हा परिषद जळगाव यांना वितरित केला आहे. उर्वरित निधी उपलब्ध आर्थिक तरतूद आणि इतर तीर्थक्षेत्रांच्या मागणीनुसार टप्प्याटप्प्याने देण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच, मंजूर निधीचा वापर केवळ निश्चित कामांसाठीच होईल याची जबाबदारी जिल्हा परिषद जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
आषाढीवारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना स्वच्छता, स्नान व पिण्याच्या पाण्याच्या सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध होणार असल्याने शासनाच्या या निर्णयाचे वारकरी व भाविकांकडून स्वागत व्यक्त करण्यात येत आहे.
