पैगंबरांवरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध; नाझिया इलाही खान यांच्याविरोधात कारवाईची मागणी.
24 प्राईम न्यूज 24 Jun 2026

पैगंबर-ए-इस्लाम हजरत मुहम्मद ﷺ यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप करत, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले. संबंधित प्रकरणात तक्रार नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष सय्यद फरहत हुसेन यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाची भेट घेतली. धार्मिक भावना दुखावणारी किंवा कोणत्याही धर्माचा अवमान करणारी वक्तव्ये सामाजिक सलोखा आणि शांततेस बाधा पोहोचवू शकतात, त्यामुळे अशा प्रकरणांची गांभीर्याने दखल घेऊन कायदेशीर प्रक्रिया राबवावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
यावर पोलीस प्रशासनाने तक्रारीची नोंद घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा आणि कायदेशीर सल्ल्यानंतर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, तसेच प्रकरणाची योग्य तपासणी करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
या वेळी नगरसेवक आसिफ पिंजारी, प्रतिनिधी नगरसेवक झकेरिया मलिक, आरिफ कमर शेख, सय्यद अर्शद अली, मुख्तार मिर्झा, सय्यद आरिफ अली, तौफिक बेग, फारुख बेग, माजी स्वीकृत नगरसेवक राजू भाई इनामदार, मन्नान भाई शिकलीगर यांच्यासह विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
समाजात शांतता, बंधुभाव आणि कायदा-सुव्यवस्था कायम राहावी यासाठी संबंधित प्रकरणात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपस्थितांनी व्यक्त केली.
