शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; आईसमोर घडली हृदयद्रावक घटना.
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : तालुक्यातील शहापूर येथे शेतात काम करत असताना वीज पडून एका ३२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, दि. २३ रोजी दुपारी सुमारे १२ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत तरुणाचे नाव राकेश रतिलाल पाटील (वय ३२) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राकेश हा आपल्या आईसह आणि मजुरांसोबत शेतातील कामासाठी गेला होता. दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे राकेश आपली दुचाकी रस्त्यावर सुरक्षित ठिकाणी लावण्यासाठी घाईने निघाला.
याच दरम्यान अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी जवळच निंबाच्या झाडाखाली त्याची आई आणि मजूर थांबलेले होते. आईच्या डोळ्यांसमोर ही दुर्घटना घडल्याने तिचा आक्रोश अत्यंत वेदनादायी होता.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, विजेचा फटका इतका तीव्र होता की राकेशच्या अंगावरील कपडे तसेच त्याच्याकडे असलेला रुमालही जळाल्याचे दिसून आले.
घटनेनंतर राकेश यांना तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
राकेश यांचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला होता. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. सायंकाळी उशिरा सुमारे सात वाजेच्या सुमारास शहापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.
