बैठकीला दांडी की पलायन? पाणीटंचाईच्या प्रश्नावर मुख्याधिकाऱ्यांविरोधात ‘शविआ’चा संताप.
अमळनेर | आबिद शेख

अमळनेर शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. २२ जून रोजी दुपारी ४ वाजता शहर विकास आघाडी (शविआ) व पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे तसेच सर्व विभागप्रमुख यांच्यात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, नियोजित वेळेवर बैठकीसाठी उपस्थित राहण्याऐवजी मुख्याधिकारी मुंबईला रवाना झाल्याचे समोर आल्याने ‘शविआ’च्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

या बैठकीसंदर्भात ‘शविआ’च्या गटनेत्या सौ. जयश्रीताई पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांशी पूर्वीच चर्चा केली होती तसेच लेखी पत्रही दिले होते. मुख्याधिकाऱ्यांनीही पत्राद्वारे बैठकीस संमती दर्शविली होती. त्यानुसार सोमवारी दुपारी साडेतीन वाजेपासून नगरसेवक व पदाधिकारी पालिकेत उपस्थित झाले. मात्र, त्यावेळी मुख्याधिकारी पालिकेत नसून मुंबईला गेल्याचे समजले.
विशेष म्हणजे, बैठकीस अनुपस्थित राहण्यापूर्वी गटनेत्या म्हणून सौ. जयश्रीताई पाटील यांना लेखी किंवा दूरध्वनीद्वारे माहिती देणे अपेक्षित होते. मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता अनुपस्थित राहिल्याने हा अपमानकारक प्रकार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, मुख्याधिकाऱ्यांनी दूरध्वनीवर नगरविकास विभागातून बोलावणे आल्याने मुंबईला जावे लागल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, रविवारी मंत्रालय व सचिवालयाला सुटी असताना नेमके कोणाकडून बोलावणे आले, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
शहर विकास आघाडीने यापूर्वी मोर्चाऐवजी चर्चेचा मार्ग स्वीकारत बैठकीस प्राधान्य दिले होते. मात्र, बैठकीत तीव्र प्रश्नांचा सामना करावा लागेल या भीतीतून मुख्याधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला का, अशीही चर्चा सुरू झाली आहे. तसेच बदलीच्या प्रयत्नांसाठीच ते मुंबईला गेल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांकडून मिळत असल्याचा दावाही करण्यात आला.
“मुख्याधिकाऱ्यांचे वागणे त्यांच्या पदाला व जबाबदारीला शोभणारे नाही. संवेदनशील विषयावर आयोजित बैठकीबाबत त्यांनी गांभीर्य दाखविले नाही. अचानक जाणे अपरिहार्य असले तरी गटनेत्या म्हणून मला माहिती देणे अपेक्षित होते. आमचे नगरसेवक व पदाधिकारी सर्व कामे बाजूला ठेवून उपस्थित होते आणि मुख्याधिकारी अनुपस्थित राहिले. ते परत आल्यानंतर आमच्या अस्तित्वाची आणि आत्मसन्मानाची जाणीव करून देऊ.”
— सौ. जयश्रीताई पाटील, गटनेत्या, शहर
