“२४ वर्षे जलकुंभ स्वच्छता नाही” दावा फोल; प्रशांत निकम यांचा स्टंट उघड – जितेंद्र ठाकूरांचा पलटवार.

0

आबिद शेख/अमळनेर 


अमळनेर  : अमळनेर नगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीत उतरून गेल्या २२ ते २४ वर्षांपासून जलकुंभांची स्वच्छता झालेली नसल्याचा दावा करणारे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम हे जनतेची दिशाभूल करत असून त्यांचा हा प्रकार निव्वळ प्रसिद्धीचा स्टंट असल्याचा जोरदार आरोप शहर विकास आघाडीचे नेते जितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. पालिकेचा इतिहास आणि अधिकृत नोंदी तपासल्यास वस्तुस्थिती समोर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


शहरातील दूषित व अनियमित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर शहर विकास आघाडीने २२ जून रोजी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरच उपनगराध्यक्षांना जलकुंभांची आठवण झाल्याचा टोला ठाकूर यांनी लगावला. प्रशासनाच्या विनंतीवरून मोर्चा स्थगित ठेवून चर्चेला प्राधान्य देण्यात आले असताना स्वतःच्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी नवीन स्टंटबाजी सुरू करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
अमळनेर शहरातील एकूण सात जलकुंभांपैकी झामी चौकातील टाकी सध्या पाडण्यात आली असून उर्वरित जुन्या टाक्यांची स्वच्छता नगराध्यक्षा जयश्रीताई अनिल पाटील यांच्या कार्यकाळात (२०११ ते २०१४) करण्यात आली होती. तत्कालीन मुख्याधिकारी सोमनाथ शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली जलकुंभ स्वच्छता मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आल्याचे ठाकूर यांनी सांगितले. त्यामुळे “२४ वर्षे स्वच्छता झाली नाही” हा दावा पूर्णपणे खोटा आणि तथ्यहीन असल्याचे त्यांनी म्हटले.
याच कालावधीत लक्ष्मीनगर, पैलाड, मुंदडा नगर, रामवाडी आणि तांबेपुरा परिसरातील नवीन जलकुंभांचे बांधकाम पूर्ण होऊन १ मार्च २०१४ रोजी त्यांचे लोकार्पण करण्यात आले होते. तसेच प्रशासकीय कार्यकाळात आणखी एका जलकुंभाची उभारणी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
गेल्या सहा महिन्यांपासून सत्तेत असताना पाणीप्रश्न सोडवण्यासाठी नेमके काय केले, याचे उत्तर उपनगराध्यक्षांनी जनतेला द्यावे, अशी मागणी ठाकूर यांनी केली. आंदोलनाच्या भीतीपोटी टाकीत उतरून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी निकम यांच्यावर निशाणा साधला.
सन २०१४ नंतर विविध नगराध्यक्ष आणि प्रशासकांच्या कार्यकाळात जलकुंभांची स्वच्छता का झाली नाही, याबाबतही प्रशांत निकम यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान ठाकूर यांनी दिले. केवळ निवडक व्यक्तींना लक्ष्य करण्याऐवजी संपूर्ण कालखंडाचा हिशोब जनतेसमोर मांडण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
जनतेची दिशाभूल थांबवून शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस पावले उचलावीत. नैतिकतेची जाणीव असेल तर लोकांच्या जिवाशी खेळणे थांबवून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जितेंद्र ठाकूर यांनी आपल्या निवेदनातून केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed