पाणी हा हक्क, भीक नाही; अमळनेरमध्ये २२ जूनला पाणी प्रश्नावर भव्य मोर्चाची हाक दोन दिवसांआड पाणीपुरवठ्याचे आश्वासन हवेत; नागरिकांना ८–८ दिवस पाण्यासाठी प्रतीक्षा.
अमळनेर | आबिद शेख

अमळनेर शहरात पाणीपुरवठ्याच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केल्याचा आरोप करत शहर विकास आघाडीने २२ जून रोजी सकाळी १० वाजता भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून नगरपालिकेपर्यंत काढण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहर विकास आघाडीच्या निवेदनानुसार, पालिका निवडणुकीदरम्यान शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये ८–८ दिवस पाणी मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. नागरिकांकडून नियमित पाणीपट्टी आकारली जात असताना पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

निवेदनात शहरातील पाणीटंचाईसोबतच रस्त्यांची दुरवस्था, भूयारी गटारींच्या कामामुळे निर्माण झालेल्या समस्या, स्वच्छतेचा अभाव, तुंबलेल्या गटारी आणि बंद पथदिव्यांमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचा मुद्दाही मांडण्यात आला आहे.
शहर विकास आघाडीने असा आरोप केला आहे की, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक असलेल्या बैठका होत नसल्याने तक्रारींकडे दुर्लक्ष होत आहे. पदाधिकारी आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव शहराच्या विकासावर परिणाम करत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे
.
मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी प्रतीकात्मक स्वरूपात हांडे आणि मडके घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“हा लढा पाण्यासाठी, जगण्याच्या हक्कासाठी आणि अमळनेरच्या सन्मानासाठी आहे,” असे आवाहन शहर विकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.

