गुटखा माफियांवर मकोकाचा बडगा; महाराष्ट्रात पहिल्यांदाच कडक कारवाईचा निर्णय.
24 प्राईम न्यूज 15 Jun 2026

सार्वजनिक आरोग्याशी खेळ करणाऱ्या गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, आता अशा प्रकारच्या गंभीर आणि संघटित गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात अशा प्रकारची कारवाई करण्याचे हे पहिले मोठे पाऊल मानले जात आहे.
या निर्णयामुळे गुटख्याचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्री करणाऱ्या संपूर्ण अवैध साखळीवर कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की केवळ मुख्य आरोपीच नव्हे तर या अवैध व्यवसायाला मदत करणाऱ्या संबंधित घटकांनाही कारवाईला सामोरे जावे लागेल.

• गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादक
• पुरवठादार आणि वितरण यंत्रणा
• गोदाम चालक व वाहतूकदार
• घाऊक व किरकोळ विक्रेते
• अवैध व्यापार साखळीला सहकार्य करणाऱ्या संबंधित व्यक्ती
मकोका अंतर्गत कडक तरतुदी
• किमान ५ वर्षांपासून ते आजीवन कारावासापर्यंत शिक्षा
• ५ लाख रुपयांपासून पुढे आर्थिक दंड
• अवैध मार्गाने मिळवलेली संपत्ती जप्त करण्याची तरतूद
राज्य सरकारच्या या निर्णयाकडे केवळ कायदेशीर कारवाई म्हणून नव्हे, तर नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण आणि तंबाखूमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. प्रशासनाने नागरिकांनाही अशा अवैध प्रकारांची माहिती संबंधित यंत्रणेला देण्याचे आवाहन केले आहे.
