युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंह यांच्या स्मृतीदिनानिमित्त अमळनेर येथे रक्तदान शिबिर; ५३ रक्त युनिट संकलन.

0

आबिद शेख/अमळनेर 


अमळनेर : युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंह जी यांच्या स्मृतीत साजरा होणाऱ्या वर्षभर चालणाऱ्या सेवा उपक्रमांच्या प्रारंभानिमित्त संत निरंकारी मिशनतर्फे देशभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत देशभरातील सुमारे ७०५ ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करून करुणा, मानवता आणि एकात्मतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.


रक्तदानाची ही सेवा परंपरा मागील चार दशकांपासून अखंडपणे सुरू असून आतापर्यंत ९,१७४ रक्तदान शिबिरांमधून सुमारे १५,००,२३० युनिट रक्त संकलित करण्यात आले आहे. यामुळे मानवसेवेप्रती निरंकारी मिशनची दृढ बांधिलकी अधोरेखित झाली आहे.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून अमळनेर येथे १४ जून रोजी संत निरंकारी सत्संग भवन, सिंधी कॉलनी, चोपडा रोड येथे सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेदरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या जनजागृतीसाठी १३ जून रोजी संपूर्ण शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली.


या रक्तदान शिबिरात एकूण ५३ रक्त युनिटचे संकलन करण्यात आले. रक्तकेंद्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धुळे येथील अनुभवी डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तदात्यांची आरोग्य तपासणी करून सुरक्षित, सुव्यवस्थित आणि प्रभावी पद्धतीने रक्तदान प्रक्रिया पूर्ण केली. संपूर्ण आयोजनात स्वच्छता, सतर्कता आणि सेवाभाव यांना विशेष प्राधान्य देण्यात आले.
युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंह जी यांनी सत्य, साधेपणा आणि सद्भावनेचा मार्ग स्वीकारत तरुणांना नशामुक्त जीवन जगण्याचे तसेच समाजसेवेसाठी स्वतःला समर्पित करण्याचे आवाहन केले होते. तसेच बाबा हरदेव सिंह जी यांनी “रक्त नाड्यांतून वाहावे, नाल्यांतून नव्हे” हा संदेश देत सेवेला जीवनाचा अविभाज्य भाग बनवले. सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सेवा संदेश आजही प्रभावीपणे पुढे नेला जात आहे.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन धुळे झोन ३६-बी चे झोनल इंचार्ज आदरणीय श्री हिरालाल पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी अमळनेर ब्रँचचे प्रमुख श्रीचंद निरंकारी उपस्थित होते.
शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांना अल्पोपहार, चहा, बिस्कीट, फळफळावळ तसेच प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमळनेर ब्रँच सेवादल इंचार्ज जितेंद्र डिंगराई, महिला इंचार्ज बहन प्रीती बटेजा तसेच अमळनेर सेवादल सदस्य व साध संगत यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed