पाडळसरे धरण प्रकल्पाच्या कामाला गती द्या; जनआंदोलन समितीची जलसंपदा सचिवांकडे मागणी.
आबिद शेख /अमळनेर

अमळनेर — तापी नदीवरील अमळनेर तालुक्यातील महत्त्वाकांक्षी निम्न तापी प्रकल्पाच्या पाडळसरे धरणाची पाहणी करण्यासाठी राज्याच्या जलसंपदा प्रकल्प व विकास विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी भेट दिली. यावेळी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन उत्तर महाराष्ट्रातील या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या कामाला प्राधान्य देत गती देण्याची मागणी केली.

निम्न तापी प्रकल्पाची पाहणी करताना सचिव डवले यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेत धरणाच्या कामाची माहिती जाणून घेतली. यानंतर पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, अर्बन बँक संचालक रणजित शिंदे, प्रा. सुनिल पाटील, रविंद्र पाटील, नगरसेवक प्रताप साळी, प्रा. भरतसिंग परदेशी आदींनी निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, तापी नदीवरील पाडळसरे येथे १९९९ मध्ये निम्न तापी प्रकल्पाची पायाभरणी झाली असली तरी राजकीय अनास्था, अपुरा निधी आणि नियोजनाच्या अभावामुळे हा प्रकल्प तब्बल अडीच दशकांपासून रखडलेला आहे. प्रस्तावित लाभक्षेत्रातील परिसर वर्षानुवर्षे अवर्षणग्रस्त असल्याने प्रशासनाने या प्रकल्पाला प्राधान्यक्रम देऊन धरणाचे बांधकाम वेगाने पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली.
तसेच धरणात लवकरात लवकर पाणी अडवण्यासाठी बांधकामासोबत पुनर्वसनाचे कामही गतीने पूर्ण करण्याची आवश्यकता समितीने व्यक्त केली. शेतकरी आणि विस्थापितांचे प्रश्न स्थानिक पातळीवर सोडवण्यासाठी धरणाच्या ठिकाणी स्वतंत्र प्रकल्प कार्यालय स्थापन करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
भूसंपादन प्रक्रियेत अनियमितता असल्याने शासनाच्या धोरणानुसार निधीचा प्रभावी वापर होत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. धरणाचे बांधकाम, भूसंपादन, पुनर्वसन आणि उपसा सिंचन योजनेची कामे गतिमान करण्याची अपेक्षा समितीने व्यक्त केली.
जलसंपदा विभागातील सचिव पातळीवरील अधिकारी प्रथमच पाडळसरे प्रकल्पाच्या पाहणीसाठी आल्याने समितीने श्री. डवले यांचे आभार मानले.
यावेळी प्रसाद चौधरी, सुशिल भोईटे, गणेश कुंवर, दीपक भोई, ॲड. विजय देवरे, एन. के. पाटील, ज्ञानेश्वर वारुळे यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन, निम्न तापी प्रकल्प कार्यालयाचे अभियंता व विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, पाडळसरे धरण जनआंदोलन समिती गेल्या दोन दशकांपासून या प्रश्नावर सातत्याने जनआंदोलन उभे करून लोकप्रतिनिधी, मंत्री आणि प्रशासनाच्या संपर्कात राहून प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले.
