कचेरी रोडवरील वाळू पुन्हा ठरली जीवघेणी; नवरा-बायको गंभीर जखमी.

Oplus_131072
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : कचेरी रोडवरील रस्त्यात पडलेली माती अखेर संबंधित विभागाने उचलून नेली असली, तरी अपघातांचे मुख्य कारण ठरत असलेली वाळू मात्र अद्याप रस्त्यावरच असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका कायम आहे. याच वाळूमुळे आज पुन्हा एका नवरा-बायकोचा गंभीर अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीचे चाक रस्त्यावर साचलेल्या वाळूवर घसरल्याने दोघेही रस्त्यावर फेकले गेले. अपघातात महिलेला गंभीर दुखापत झाली असून त्या काही काळ बेशुद्ध अवस्थेत होत्या. त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर मार लागला असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. तसेच शरीराच्या विविध भागांनाही गंभीर दुखापती झाल्या आहेत.

तर त्यांच्या पतीच्या हात, पाय, गुडघा आणि अंगठ्याला मोठ्या जखमा झाल्या आहेत. अपघातानंतर काही काळ दोघांनाही हालचाल करणे शक्य नव्हते. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत दोघांनाही तातडीने वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले.

दरम्यान, कचेरी रोडवरील वाळूमुळे अपघातांची मालिका सुरूच असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वारंवार अपघात होऊनही संबंधित विभागांकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
आता प्रश्न उपस्थित होत आहे की, अजून किती निष्पाप नागरिक जखमी झाल्यानंतर प्रशासन जागे होणार? एखादा निष्पाप जीव गेल्यानंतरच संबंधित विभाग कारवाई करणार का?
नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) आणि संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रस्त्यावर पडलेली वाळू हटवावी व नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ थांबवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
