प्रभाग क्र. १३ मधील पाणीपुरवठा, रस्ते व गटारांच्या प्रश्नांसाठी नगरसेविका जुबेदाबी शेख आक्रमक नवीन जलवाहिन्या, काँक्रीट रस्ते व गटारांच्या कामांसाठी नगराध्यक्षांकडे निवेदन.

0
New Doc 06-02-2026 09.39

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १३ (अ) मधील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीपुरवठा, रस्ते व गटारांच्या समस्यांबाबत नगरसेविका जुबेदाबी नशिरोद्दीन शेख यांनी पुढाकार घेत नगराध्यक्षांकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे. प्रभागातील विविध भागांमध्ये नवीन जलवाहिन्या टाकणे, काँक्रीट रस्त्यांची उभारणी करणे तसेच गटारांची कामे तातडीने मंजूर करून हाती घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.


नगरसेविका शेख यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभागातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा घरांपर्यंत नियमित व पुरेशा प्रमाणात पोहोचत नाही. जुन्या व अपुऱ्या जलवाहिन्यांमुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून नगरपरिषदेकडे वारंवार तक्रारी करण्यात येत आहेत. त्यामुळे छोटा भाजी बाजार येथील रमेश धोबी यांच्या घरापासून माजी नगरसेवक शेखा हाजी यांच्या घरापर्यंत, माजी नगरसेवक हाजी अलाउद्दीन यांच्या जुन्या घरापासून युसुफ मिर्झा व अजीज मुल्ला यांच्या घरापर्यंत, हत्तीवाडा परिसरातील अमीर मिस्त्री यांच्या घरापासून कमरुजमा वायरमन यांच्या घरापर्यंत तसेच मण्यारवाडा येथील शिजगर मशिदीपासून फकीरवाड्यातील शरीफखा महेबूबखा यांच्या घरापर्यंत नवीन ६ इंची जलवाहिनी टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.


याशिवाय प्रभागातील अनेक भागांमध्ये रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून पावसाळ्यात नागरिकांना ये-जा करण्यास अडचणी निर्माण होतात. झामी चौक, चंदनपीर अखाडा परिसर, कसाली मोहल्ला, जामा मस्जिद परिसर, मण्यारवाडा, फकीरवाडा, माळीवाडा तसेच आबाजी महाजन यांच्या घराजवळील भागात नवीन काँक्रीट रस्ते तयार करण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच चौधरी वाड्यातील विहिरीचे सुशोभीकरण व आवश्यक बांधकाम करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
जामा मस्जिद परिसरात गटारांचे दूषित पाणी रस्त्यावर वाहत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन गटार बांधून त्यावर लोखंडी जाळ्या बसविण्याची आवश्यकता असल्याचे नगरसेविका शेख यांनी नमूद केले आहे.
प्रभागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित या मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषदेने संबंधित कामांना प्रशासकीय मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगरसेविका जुबेदाबी शेख यांनी केली आहे. दरम्यान, नगरसेविकेच्या या पाठपुराव्यामुळे प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छतेच्या समस्या मार्गी लागतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed