शेतकरी सहकारी संघ निवडणुकीतील विजयानंतर गणेश भामरे यांचे मतदारांचे आभार.

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर : अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघ लिमिटेडच्या पंचवार्षिक निवडणूक 2025-30 मध्ये सोसायटी (ठराव) मतदारसंघातून भरघोस विजय मिळाल्यानंतर नवनियुक्त संचालक गणेश धर्मराज भामरे (पाटील) यांनी सर्व मतदार, शेतकरी बांधव, नेते, कार्यकर्ते, सहकारी पोलीस पाटील, पत्रकार, नातेवाईक, हितचिंतक तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

विजयानंतर प्रसिद्ध केलेल्या संदेशात गणेश भामरे यांनी सांगितले की, हा विजय केवळ वैयक्तिक नसून शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेने दाखविलेल्या विश्वासाचा विजय आहे. मतदारांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत शेतकरी हित, सहकार क्षेत्राचा विकास आणि ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत मिळालेल्या या यशाबद्दल त्यांनी सर्व मतदारांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करत भविष्यातही सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
गणेश धर्मराज भामरे (पाटील) हे बाम्हणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन, बाम्हणे येथील पोलीस पाटील तसेच केशवा अँडव्हर्टायझिंग अँड डिझाईनिंगचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांच्या निवडीमुळे परिसरातील शेतकरी व सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
