प्रताप महाविद्यालयात एनसीसी छात्र सैनिकांना अग्निशमन व आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण.

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : प्रताप महाविद्यालयात 49 महाराष्ट्र बटालियन अमळनेर यांच्या वतीने आयोजित एन.सी.सी. संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिर (CATC-209) उत्साहपूर्ण वातावरणात सुरू असून दि. 20 मे ते 29 मे 2026 या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत दि. 26 मे रोजी अमळनेर नगरपरिषद अग्निशमन विभागातर्फे छात्र सैनिकांना आग विझविणे व आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात आले.
या शिबिरात 48 महाराष्ट्र बटालियन धुळे, 49 महाराष्ट्र बटालियन अमळनेर आणि 50 महाराष्ट्र बटालियन छत्रपती संभाजीनगर येथील छात्र सैनिकांचा सहभाग असून प्रताप महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित शिबिरात तब्बल 356 छात्र सैनिक सहभागी झाले आहेत.
अमळनेर नगरपरिषद अग्निशमन अधिकारी श्री. गणेश गोसावी यांनी छात्र सैनिकांना आगीचे विविध प्रकार, आग विझविण्याच्या पद्धती तसेच अग्निशमन साहित्यांची सविस्तर माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन विभागातील कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारूक शेख व आकाश संदानशिव यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे आग नियंत्रणाचे प्रशिक्षण दिले.

हे प्रशिक्षण शिबिर 49 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अमित रे तसेच मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध व सुव्यवस्थित पद्धतीने पार पडत आहे. यावेळी प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल पिनाकी बानकी, एएनओ कॅप्टन डॉ. भारतकुमार सपकाळ, कॅप्टन डॉ. प्रमोद चौधरी, लेफ्टनंट डॉ. राहुल जाधव, सेकंड ऑफिसर रोहन पाटील, सुभेदार गजेसिंग, प्रशिक्षण जेसीओ सुभेदार कुलदीप सिंग तसेच परेड इन्स्ट्रक्टर स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले.
वाढत्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्राथमिक ज्ञान प्रत्येकाला असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अग्निशमन अधिकारी श्री. गणेश गोसावी यांनी केले. देशसेवेची प्रेरणा देणारे व छात्र सैनिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे हे प्रशिक्षण असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी 49 महाराष्ट्र बटालियन अमळनेर यांच्या वतीने अमळनेर नगरपरिषद अग्निशमन दलाचा सत्कार करण्यात आला.
