अमळनेरात राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य बूथ मेळावा आज..
आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर : लोकशाहीची खरी ताकद बूथ स्तरावर उभी राहते आणि संघटनेचे बळ कार्यकर्त्यांच्या एकजुटीतून निर्माण होते, या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अमळनेर मतदारसंघाचा भव्य बूथ मेळावा आज आयोजित करण्यात आला आहे.

हा मेळावा शुक्रवार, दि. २४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता बन्सीलाल पॅलेस येथे पार पडणार असून, माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील आणि जिल्हाध्यक्ष संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मेळाव्यात आगामी राजकीय घडामोडी, संघटन मजबुती, तसेच बूथ स्तरावरील नियोजन आणि कार्यपद्धती याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. “प्रत्येक बूथ अधिक सक्षम करण्यासाठी हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा आहे,” असे आयोजकांनी नमूद केले आहे.

तसेच सर्व बीएलए (बूथ लेव्हल एजंट), कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. “आपली उपस्थिती ही केवळ सहभाग नसून संघटनेच्या बळकटीसाठी महत्त्वपूर्ण योगदान ठरेल,” असे सांगत एकजुटीने कार्य करून अमळनेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक सक्षम व प्रभावी बनवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
