शिक्षकांचे ७ महिन्यांचे वेतन थकीत; युवा सेनेचा इशारा – ८ दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलन..
आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर : श्री शिवाजी हायस्कूल, तांबेपुरा (अमळनेर) येथील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मागील सात महिन्यांचे वेतन थकीत असल्याने संताप व्यक्त होत असून, याबाबत युवा सेनेने प्रशासनाला तीव्र इशारा दिला आहे. ऑगस्ट २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीतील वेतन अद्याप न मिळाल्याने संबंधित कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

या संदर्भात शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद जळगाव यांना गट शिक्षणाधिकारी, अमळनेर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित शाळेतील कर्मचारी गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ प्रामाणिकपणे सेवा बजावत असतानाही त्यांना वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे, ही अत्यंत गंभीर व लाजिरवाणी बाब असल्याचे म्हटले आहे.
प्रशासनाकडे वेतन बिले उपलब्ध असतानाही कोणतेही स्पष्ट कारण किंवा लेखी आदेश न देता ती प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दिरंगाईमुळे कर्मचाऱ्यांचे गृहकर्ज व वैयक्तिक कर्जाचे हप्ते थकले असून, दैनंदिन खर्च भागवणेही कठीण झाले आहे. परिणामी, कुटुंबीयांवर आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

युवा सेनेने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत, “पिढी घडवणाऱ्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ येणे ही अत्यंत गंभीर बाब असून याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे,” असे स्पष्ट केले आहे.
युवा सेनेने मागणी केली आहे की, प्रलंबित सात महिन्यांचे वेतन तात्काळ अदा करून त्याबाबत लेखी आदेश द्यावेत. अन्यथा, येत्या आठ दिवसांत ठोस निर्णय न घेतल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच, यामुळे उद्भवणाऱ्या सर्व सामाजिक व कायदेशीर परिणामांची जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 152000
22 Ct सोने 91.60% : ₹. 139200
18 Ct सोने 75.00% : ₹. 115500
शुद्ध चांदी 999%:₹. 2480/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
