अमळनेर तालुका शहर विकास आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; सर्वसाधारण सभा न घेतल्याचा आरोप…

0
New-Doc-03-30-2026-23.30.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : अमळनेर नगरपरिषदेकडून मार्च २०२६ महिन्यात सर्वसाधारण सभा घेण्यात आलेली नसल्याचा गंभीर आरोप करत अमळनेर तालुका शहर विकास आघाडीच्या वतीने

जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे निवेदन देण्यात आले आहे.
अमळनेर तालुका शहर विकास आघाडीच्या अध्यक्ष जयश्री अनिल पाटील व सचिव अॅड. यज्ञेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, अमळनेर नगरपरिषदेची मागील सर्वसाधारण सभा दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती.

त्या सभेत १ ते ३० विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले होते. मात्र त्यानंतर नियमानुसार पुढील सर्वसाधारण सभा एक महिन्याच्या आत म्हणजेच २४ मार्च २०२६ पर्यंत घेणे कायद्याने बंधनकारक होते, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, शहरात सध्या पाणीपुरवठा, रस्ते, गटार, स्वच्छता तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत.अमळनेर नगर परिषदेच्या माध्यमातून आगामी एप्रिल महिन्यातील महात्मा जोतिबा फुले जन्मोत्सव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अमळनेरची अक्षयतृतीया – संत सखाराम महाराज यात्रा उत्सव नियोजन व शहरातील विविध समस्या, तक्रारी व विकासकामांची मागणी यासाठी दर महिन्याची सर्वसाधारण सभा घेणे आवश्यक आहे. मात्र कायदेशीर शासन आदेश असून सुद्धा सत्ताधारी दर महिन्याची सर्वसाधारणपणे सभा घेत नसून अमळनेरकर नागरिकांचे समस्या, तक्रारी व नगरसेवकांचे नागरीहितांचे प्रश्न सोडविण्या पासून पळ काढीत आहेतनागरिक तसेच लोकप्रतिनिधींकडून विकासकामांसाठी अनेक मागणी अर्ज नगरपरिषदेकडे प्रलंबित आहेत. तरीही लोकनियुक्त नगराध्यक्ष सर्वसाधारण सभा न घेता आपल्या कर्तव्यातून व जबाबदारीतून पळ काढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील संबंधित कलमानुसार दर महिन्याला सर्वसाधारण सभा घेणे आवश्यक आहे. तरीही नियमांचे उल्लंघन करून सभा न घेणे हा कायद्याचा भंग असून संबंधित जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर सौ. जयश्री अनिल पाटील यांच्यासह स्वप्ना विक्रांत पाटील, कविता विजयसिंग राजपूत, सचिन विभाकर कासार, सचिन बळवंत पाटील, विजय पाटील, भरतकुमार सुरेश ललवाणी, देवेंद्र भानुदास कांबळे, अफसाना मुक्तार खाटीक, प्रविण गंगाराम पाटील आणि शोभाबाई भिवसन गढरे आदी नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहे.
या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे आता अमळनेर शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed