प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर शेडचा अभाव; अमळनेरहून जळगावकडे जाणाऱ्या प्रवाश्यांची गैरसोय वाढली..
अमळनेर | आबिद शेख
अमळनेर रेल्वे स्टेशन येथे प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर शेडची सुविधा नसल्यामुळे जळगावकडे जाणाऱ्या प्रवाश्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत तापमान वाढल्याने प्रवाश्यांची गैरसोय अधिकच वाढली आहे.

अमळनेर येथून जळगाव कडे जाणारी बहुतांश गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर येतात. मात्र या प्लॅटफॉर्मवर शेड अपुरी असून गाडी अनेक वेळा शेडच्या पुढे जाऊन थांबते. त्यामुळे प्रवाश्यांना उन्हातच उभे राहावे लागते. लहान मुले, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना याचा विशेष त्रास सहन करावा लागत आहे.
याशिवाय प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर जाण्यासाठी प्रवाश्यांना क्रॉसिंगचा देखील त्रास सहन करावा लागतो. उन्हात थांबणे, शेडचा अभाव आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने असलेली अडचण यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

स्थानिक प्रवाशांनी या संदर्भात भारतीय रेल्वे प्रशासनाकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर संपूर्ण शेड उभारणे, प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था करणे तसेच गाड्या शेडखालीच थांबतील याची खबरदारी घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने ही समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
