रिंग रोड कामाला पाणी टंचाईची झळ? डिव्हायडरच्या कामावर नागरिकांचा सवाल..

0
New-Doc-03-28-2026-21.55.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : शहराला जोडणाऱ्या रिंग रोडचे काम सध्या सुरू असले तरी या कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पाच्या कामावर पाणी टंचाईची झळ बसत असल्याचा उपरोधिक टोला शहरवासीयांनी मारला आहे. प्रसाद नगर ते मुंदडा गेट या दरम्यान रिंग रोडच्या मध्यभागी डिव्हायडर बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र या कामावर पाणी मारले जात नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.


सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलेल्या या रस्त्याच्या कामाबाबत ठेकेदाराकडून दर्जा राखला जात नसल्याचीही तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. डिव्हायडरचे काम सुरू असताना वाळू आणि बांधकाम साहित्य रस्त्यावरच टाकले जात असल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.


मुंदडा नगर एक गेट परिसरात रस्ता ओलांडताना नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याचेही सांगितले जात आहे. रस्त्यावर टाकलेल्या वाळूमुळे गेल्या आठवड्यात लहान-मोठे अपघात घडल्याची माहिती नागरिकांनी दिली. कॉलनीचा रस्ता खाली आणि ऐंशी फुटी मुख्य रस्ता वर असल्यामुळे जोडणीच्या ठिकाणी योग्य उतार न केल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, या संपूर्ण कामाकडे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या कामाची तात्काळ चौकशी करून योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

कामाच्या गुणवत्तेची चौकशी करावी
रिंग रोडच्या कामावर सुरुवातीपासूनच योग्य प्रमाणात पाणी मारले गेले नसल्याने कामाची गुणवत्ता ढासळल्याचा आरोप होत आहे. सध्या सुरू असलेल्या डिव्हायडरच्या कामावरही पाणी मारले जात नसल्याने कडक उन्हात हे कोट्यवधी रुपयांचे काम मातीमोल होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या कामाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed