अमळनेर नगरपरिषद पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा संप टळला; बैठकीत तोडगा, थकीत वेतन देण्याचा निर्णय..
अमळनेर /आबिद शेख
नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने निर्माण झालेला संपाचा प्रश्न अखेर मिटला आहे. संयुक्त बैठकीत तोडगा निघाल्याने कर्मचाऱ्यांनी १९ मार्चपासूनचा संपाचा इशारा मागे घेतला आहे.

नगरपरिषदेने पाणीपुरवठ्याचे कंत्राट दिल्यानंतर डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळाले नव्हते. त्यामुळे अल्प पगारावर काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. कंत्राटदाराला पालिकेकडून बिल न मिळाल्यामुळे कामगारांचे वेतन रखडल्याची माहिती समोर आली होती.
याबाबत कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत वेतन न मिळाल्यास पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला होता.

त्यामुळे आजच आंतरराष्ट्रीय शाळेत प्रवेश घेऊन निश्चिन्त व्हा.
दरम्यान, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, मुख्याधिकारी गणेश शिंदे, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, अभियंता प्रविण बैसाणे तसेच कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेण्यात आली.
बैठकीत पालिकेने कंत्राटदाराचे एक बिल तातडीने अदा करावे, तसेच कंत्राटदाराने कामगारांना दोन महिन्यांचे थकीत वेतन त्वरित द्यावे आणि पुढील बिल मिळाल्यानंतर उर्वरित एका महिन्याचा पगार देण्यात यावा, असा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करत नियोजित संप मागे घेतला असून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे.
