भोंगरीया–होळी पार्श्वभूमीवर चोपड्यात अवैध मद्यसाठा जप्त मध्यप्रदेश निर्मित बिअर व बनावट देशी दारूसह ७.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांवर गुन्हा दाखल..

चोपडा/ प्रतिनिधी
चोपडा (जि. जळगाव) : भोंगरीया व होळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने चोपडा तालुक्यात मोठी कारवाई करत मध्यप्रदेश निर्मित बिअर, बनावट देशी दारू व वाहनासह एकूण ७ लाख ८१ हजार ०१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा १९४९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मा. डॉ. राजेश देशमुख (भा.प्र.से), आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. प्रसाद सुर्व, सह आयुक्त (अमलबजावणी व दक्षता), महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. उषा वर्मा, विभागीय उपआयुक्त, नाशिक विभाग, नाशिक तसेच डॉ. विठ्ठल टी. भुकन, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव यांच्या आदेशानुसार सणाच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता मोहीम राबविण्यात येत आहे.
याच अनुषंगाने जवान भूषण सुभाष परदेशी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, उनपदेव शिवार, उनपदेव–वर्डी रस्ता (ता. चोपडा) येथे भोंगरीया–होळी सणानिमित्त मध्यप्रदेश निर्मित बिअर व बनावट विदेशी/देशी मद्याची विक्री होणार आहे. मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार दि. २ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजता सापळा रचण्यात आला.
कारवाईदरम्यान महेंद्र कंपनीची बोलेरो पिकअप (क्रमांक एमपी-४६-झेडबी-८४५४) उभी करून त्यातून मद्यविक्री सुरू असल्याचे आढळून आले. वाहनाची तपासणी केली असता खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला :
माऊंट ६००० स्ट्राँग बिअर (५०० मि.लि.) – ३६६ कॅन (एमआरपी ₹११५) – ₹४२,०९०
बनावट देशी दारू ‘टँगो पंच’ (१८० मि.लि.) – २७३ बाटल्या (एमआरपी ₹८०) – ₹२१,८४०
बनावट देशी दारू ‘टँगो पंच’ (९० मि.लि.) – २६२ बाटल्या (एमआरपी ₹४०) – ₹१०,४८०
बनावट ‘रॉयल स्टंग’ (१८० मि.लि.) – २४ बाटल्या – ₹६,०००
महेंद्र बोलेरो पिकअप वाहन – ₹३,००,०००
दोन प्लास्टिक टब – ₹६००
एकूण मुद्देमाल किंमत : ₹७,८१,०१०
या प्रकरणी १) अत्तरसिंग मांगिलाल बारेला (वय २७) व २) विकास बिरसिंग बारेला (वय २९), दोघेही रा. मुळ्या उतार, पोस्ट वैजापूर, ता. चोपडा, जि. जळगाव यांच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ)(ई), ८०, ८१, ८३, ९० व १०८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई निरीक्षक अब्दुल कैय्युम सु. मोमीन, दुय्यम निरीक्षक कुमारी निकिता खपके, जवान-नि-वाहनचालक विपुल बलदेव राजपूत तसेच जवान भूषण परदेशी, कुणाल सोनावणे, नितीन पाटील, दिनेश पाटील यांच्या पथकाने केली. यासाठी भरारी पथक जळगावचे निरीक्षक अशोक पी. तारु, दुय्यम निरीक्षक योगेश सूर्यवंशी तसेच जवान नरेंद्र पाटील, राहुल सोनवणे व महिला जवान पुनम पाटील यांनी सहकार्य केले.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास अधीक्षक डॉ. विठ्ठल टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अ.के.सु. मोमीन करीत आहेत.
दरम्यान, अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक किंवा विक्रीबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००३३९९९९ तसेच व्हॉट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

