पत्रकार वसंतराव पाटील यांचा सपत्नीक सत्कार..
आबिद शेख/अमळनेर
पाडळसरे येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच दैनिक लोकमतचे पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील यांची महाराष्ट्रातील गुर्जर समाजासाठी कार्य करणाऱ्या वीर गुर्जर सेनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

वीर गुर्जर सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी त्यांची या पदावर नियुक्ती केली आहे. तसेच जेष्ठ पत्रकार नरेंद्र कदम व भगवान सोनार यांनी त्यांची “गर्जना ग्रामीण पत्रकार संघटना”च्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी एकमुखी निवड केली.
या दुहेरी सन्मानानिमित्त महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वतीने पाडळसरे येथील निवासस्थानी जाऊन सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
मंत्री महोदयांचे स्वीय सहाय्यक नवलसिंगराजे पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील व सौ. आशाबाई वसंतराव पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी उपसरपंच भटू पाटील तसेच शिवसेनेचे तालुका संघटक इंजि. चंद्रशेखर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
