कसाली मोहल्ल्यात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; अग्निशामक दल, लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली..
अमळनेर/ आबिद शेख
शहरातील कसाली मोहल्ल्यात अन्सारी गल्ली जवळ काल मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचे स्वरूप भीषण असल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, अमळनेर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी दाखवलेल्या धाडसामुळे मोठी जीवितहानी टळली असून आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आले.
रात्रीच्या शांततेत अचानक झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे कसली मोहल्ल्यात ठिणग्या उडाल्या आणि काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ अमळनेर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला पाचारण केले.
लोकप्रतिनिधी व नागरिकांची तत्काळ धाव
आगीची माहिती मिळताच परिसरातील माजी व विद्यमान नगरसेवकांनी घटनास्थळी धाव घेतली. केवळ उपस्थित राहून न थांबता त्यांनी प्रत्यक्ष आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यामध्ये फिरोज पठाण, नासिर हाजी, नवीद शेख, नाना धनगर, गुलाम नबी, इमरान शेख, अरमान हलवाई, वसीम पठाण, तय्यब पठाण, रिजवान मनियार, नईम पठाण, छोटू भोई, सुपडू मणियार आदींचा समावेश होता.
या सर्वांनी अग्निशामक दलाच्या जवानांना मोलाची मदत करत पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले तसेच आग पसरू नये यासाठी सुरक्षित अंतर राखण्याबाबत दक्षता घेतली.
अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न
अमळनेर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आगीवर नियंत्रण मिळवले. अरुंद गल्ली, दाट वस्ती आणि धुराचे लोट असतानाही जवानांनी जीवाची पर्वा न करता पाण्याचा मारा करत आग विझवली. नागरिक व लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहकार्यामुळे आग आसपासच्या घरांपर्यंत पोहोचण्याआधीच आटोक्यात आणण्यात यश आले.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून, अग्निशामक दल, लोकप्रतिनिधी व मदतीला धावून आलेल्या नागरिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 155000
22 Ct सोने 91.60% : ₹. 142600
18 Ct सोने 75.00% : ₹. 117800
शुद्ध चांदी 999%:₹. 2850/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
