उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांची आज शपथ; राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड निश्चित.

0
New-Doc-01-31-2026-07.52.jpg


24 प्राईम न्यूज 31 Jan 2026
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी खासदार सुनेत्रा पवार यांची निवड निश्चित झाली आहे. त्यासाठी आज, शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची तातडीची बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीत त्यांच्या निवडीची औपचारिकता पूर्ण केली जाणार आहे.
आज दुपारी २ वाजता विधानभवनात होणाऱ्या आमदारांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नव्या नेत्या म्हणून सुनेत्रा पवार यांच्या निवडीचा ठराव मांडण्यात येणार आहे. सर्व आमदारांच्या एकमताने हा ठराव मंजूर केला जाईल, असा विश्वास पक्षनेत्यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता लोकभवन येथे सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. साध्या पद्धतीने होणाऱ्या या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेससह भाजप व शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
पतीच्या आकस्मिक निधनानंतर अत्यंत अवघड परिस्थितीत राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. त्यांच्या या निर्णयाकडे राज्याच्या राजकारणात ऐतिहासिक क्षण म्हणून पाहिले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांचे बुधवारी बारामतीत विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह राज्याच्या राजकारणाला मोठा धक्का बसला. या दुःखद घटनेनंतर पक्षाने संयम राखत विधिमंडळ पक्षाच्या नेतृत्वाबाबत चर्चा सुरू केली. पक्षाचा विधिमंडळ नेता दिवंगत अजित पवार यांच्या कुटुंबातीलच असावा, अशी भावना अनेक नेत्यांनी व्यक्त केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी गुरुवारी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांना विधिमंडळ पक्षनेतेपद स्वीकारण्याची विनंती केली होती. मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली. यानंतर शुक्रवारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली.
या पार्श्वभूमीवर आज विधानभवनात होणाऱ्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या निवडीचा ठराव एकमताने मंजूर होण्याची शक्यता असून, त्यानंतर त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा नेतृत्व बदल भावनिक असला, तरी पक्षाला पुढे नेण्यासाठी नवी दिशा देणारा ठरेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 169000

22 Ct सोने 91.60% : ₹. 155500

18 Ct सोने 75.00% : ₹. 128500

शुद्ध चांदी 999%:₹. 3450/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed