अमळनेरचा दिनेश बागडे ‘गुणवंत खेळाडू’ पुरस्काराने सन्मानित..
अमळनेर /आबिद शेख
अमळनेर येथील दिनेश शशी बागडे याला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दिला जाणारा ‘गुणवंत खेळाडू’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जळगाव येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार दिनेश बागडे याला देण्यात आला. नुकतेच उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय पॅरा पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत दिनेश बागडे याने १०७ किलो वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक पटकावले होते. या उल्लेखनीय यशाची दखल घेत जिल्हा प्रशासनाकडून त्याचा सन्मान करण्यात आला.
या पुरस्कार वितरण समारंभास जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्यासह विविध अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
दिनेश बागडे यांच्या या यशामुळे अमळनेर तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला असून त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

