अमळनेर बाजार समितीतील पदभरती प्रक्रियेवर टांगती तलवार. परीक्षा केंद्राबाबत खुलासा व अनुमती पत्राची मागणी; युवक काँग्रेसचा आक्षेप..

0
New-Doc-01-21-2026-07.40.jpg


अमळनेर |आबिद शेख
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, परीक्षा आयोजनाबाबत स्पष्ट खुलासा व अधिकृत अनुमती पत्र देण्याची मागणी अमळनेर तालुका युवक काँग्रेसने केली आहे.

शेवटचे 4 दिवस
तुमच्या स्वप्नातील दागिन्यांसोबत तुमची स्वप्नंही साकार करा !


अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील रिक्त पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षा अमळनेर शहरात किंवा तालुक्यात न घेता अमळनेरपासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावरील धुळे जिल्ह्यातील भोकर येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक बेरोजगार भूमिपुत्रांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशी परीक्षा केंद्रे निवडण्यामागील नेमका हेतू काय, याबाबत स्पष्ट खुलासा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत अमळनेर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. हर्षल अशोकराव जाधव यांच्या पत्नी सौ. प्रतिभा हर्षल जाधव व परिक्षार्थी शशिकांत प्रकाश पाटील यांनी दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सचिव यांच्याकडे लेखी पत्र दिले आहे. या पत्रात जिल्हा उपनिबंधक, जळगाव यांनी यापूर्वी दिलेली पदभरती स्थगिती उठवून परीक्षा आयोजनास अनुमती दिल्याबाबतचा अधिकृत पत्रव्यवहार व त्यातील आशय स्पष्ट करणारा खुलासा मागण्यात आला आहे.
मात्र, मागणी करूनही संबंधित अनुमती पत्र व खुलासा पत्राची प्रत देण्यात आलेली नाही. यामुळे सर्वसामान्य प्रवर्गातील बेरोजगार उमेदवारांची दिशाभूल व फसवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच बाजार समितीतील संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना तसेच आर्थिक तडजोड करणाऱ्या धनाढ्य उमेदवारांना लाभ मिळवून देण्यासाठीच ही प्रक्रिया राबवली जात असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.
जर संबंधित कागदपत्रे व खुलासा उपलब्ध करून देण्यात आला नाही, तर या कथित नियमबाह्य व भ्रष्ट कार्यपद्धतीविरोधात न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मागितला जाईल, असा इशाराही पत्राद्वारे देण्यात आला आहे. परिणामी, अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील पदभरती प्रक्रियेवरील प्रश्नचिन्ह अद्याप कायम असून, या प्रकरणाकडे सर्वसामान्य बेरोजगारांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed