समर्पित समाजसेवा व धगधगती राष्ट्रभक्ती आजही प्रेरणादायी – श्री. सतीश देशमुख..
अमळनेर | आबिद शेख
दिनांक १२ जानेवारी रोजी स्वराज्य जननी राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व युवाशक्तीचे प्रेरणास्थान श्री स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त समर्पण दिन अमळनेर येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. ताईसाहेब स्मिता चंद्रात्रे या होत्या. प्रमुख पाहुणे व मुख्य मार्गदर्शक म्हणून श्री. सतीश देशमुख (जिल्हा उपाध्यक्ष) तसेच श्री. भाऊसाहेब देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

लकी कूपन योजने चे शेवटचे काही दिवस शिल्लक…!!
योजना कालावधी
25 जानेवारी 2026 पर्यंत
916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% *
कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते युगपुरुष श्री स्वामी विवेकानंद, स्वराज्य प्रेरक राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे संस्थापक अध्यक्ष स्व. बिंदुमाधव जोशी ऊर्फ नाना यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. ग्राहक संघटन मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात ॲड. ताईसाहेब भारती अग्रवाल यांनी केली व त्यांनीच कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले.
प्रमुख मार्गदर्शन करताना श्री. सतीश देशमुख यांनी श्री स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या धगधगत्या राष्ट्रभक्तीचे व समर्पित समाजसेवेचे विचार आजही समाजासाठी तितकेच प्रेरणादायी असल्याचे विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केले. त्यांनी युवकांनी या विचारांचा अंगीकार करून समाजकार्याशी जोडले जावे, असे आवाहन केले.
राष्ट्रीय युवा दिन व समर्पण दिनाचे आद्य प्रवर्तक तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे आद्य दैवत श्री स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर श्री. भाऊसाहेब देशमुख यांनी सखोल विवेचन केले. विवेकानंदांचे विचार आजच्या सामाजिक व नैतिक मूल्यांसाठी किती उपयुक्त आहेत, हे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमात अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या समाजाभिमुख कार्याचा आढावा घेताना तालुका अध्यक्षा सौ. ताईसाहेब स्मिता चंद्रात्रे यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून समाजातील निराधार व गरजू वृद्धांच्या सेवेत अग्रेसर असलेल्या पुणे येथील आभाळमाया वृद्धाश्रम साठी विशेष उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती दिली. समर्पण दिनाचे औचित्य साधून जिल्हा सहसचिव श्री. भाईसाहेब मकसूद बोहरी (अमळनेर), सौ. ताईसाहेब मेहराज भाभी व कुटुंबीय यांनी स्वतः शिवलेली २५ उबदार ब्लँकेट्स गरजू वृद्धांसाठी सुपूर्द करण्यात आली.
ही ब्लँकेट्स महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी प्रतिनिधी सदस्या ॲड. भारती अग्रवाल, ऊर्जा मित्र श्री. सुनील वाघ व ज्येष्ठ पत्रकार श्री. सुभाष पाटील यांच्याकडे तालुका अध्यक्षा सौ. स्मिता चंद्रात्रे, उपाध्यक्षा सौ. ज्योती भावसार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. ही सामग्री लवकरच पुणे येथील आभाळमाया वृद्धाश्रमात पोहोचविण्यात येणार आहे.
कार्यक्रमास आदर्श शिक्षक श्री. सतीश देशमुख, निवृत्त प्रशासन अधिकारी श्री. भाऊसाहेब देशमुख, ऊर्जा मित्र श्री. सुनील वाघ, सायबर बँक क्राईम जागृती मार्गदर्शक श्री. विजय शुक्ला, प्रांत कार्यकारिणी सदस्या ॲड. भारती अग्रवाल, ज्येष्ठ मार्गदर्शक व माजी सनदी अधिकारी श्री. काकासाहेब उपासनी, ज्येष्ठ पत्रकार श्री. सुभाष पाटील, महिला संघटक सौ. मेहराज भाभी मकसूद बोहरी, तालुका उपाध्यक्ष सौ. ज्योती भावसार यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ॲड. ताईसाहेब भारती अग्रवाल यांनी केले. आभार प्रदर्शन तालुका उपाध्यक्षा सौ. ताईसाहेब ज्योती भावसार यांनी केले, तर ॲड. भारती अग्रवाल यांनी शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता केली.
