खेलो इंडिया ट्रायबल गेम्सच्या राष्ट्रीय निवड चाचणीसाठी पिंपळे बु. आश्रमशाळेचे खेळाडू पात्र..
अमळनेर /आबिद शेख
खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2025–26 अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स निवड चाचणीत अनुदानित आदिवासी आदर्श आश्रमशाळा, पिंपळे बु. (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याची संधी मिळवली आहे. ही निवड चाचणी मंगळवार, दि. 13 जानेवारी 2026 रोजी पोलीस मैदान, पालघर येथे पार पडली.

लकी कूपन योजने चे शेवटचे काही दिवस शिल्लक…!!
योजना कालावधी
25 जानेवारी 2026 पर्यंत
916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% *
या निवड चाचणीत वासुदेव भिमसिंग पावरा (इ. 12 वी विज्ञान) याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत दुहेरी यश संपादन केले. 100 मीटर धावणे तसेच लांब उडी या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत त्याने ‘दुहेरी मुकुट’ मिळवला. त्याच्या वेगवान धावण्याच्या कौशल्यासह लांब उडीतील दमदार कामगिरीने परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
तसेच रोशनी लक्ष्मण पावरा (इ. 11 वी विज्ञान) हिने थाळी फेक या क्रीडा प्रकारात प्रभावी कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळवला. सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन याचे हे यशस्वी फलित असल्याचे क्रीडा तज्ज्ञांनी मत व्यक्त केले.
विशेष बाब म्हणजे, फेब्रुवारी 2026 मध्ये छत्तीसगड राज्यात पहिल्यांदाच खेलो इंडिया ट्रायबल गेम्स या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत देशभरातील आदिवासी खेळाडू सहभागी होणार असून, वासुदेव व रोशनी यांच्याकडून उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या यशामुळे दोन्ही खेळाडू आता खेलो इंडियाच्या राष्ट्रीय स्तरावरील निवड चाचणीसाठी पात्र ठरले आहेत.
या खेळाडूंना उच्च माध्यमिक शिक्षक स्वप्निल हिंमतराव पाटील व प्राथमिक शिक्षक दीपक नांद्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संघव्यवस्थापक म्हणून योगेश भामरे यांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
