अमळनेर–चाळीसगाव (पारोळा मार्गे) नवीन बस सुरू करण्याची मागणी; नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी आमदार अनिल पाटील यांचे आगार व्यवस्थापकांना पत्र..

अमळनेर | आबिद शेख
अमळनेर ते चाळीसगाव (पारोळा मार्गे) या मार्गावर टेहू–मेहू, शिंदी कोळगाव, कजगाव आदी गावांमधून जाणारी नवीन एस.टी. बस सुरू करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी यापूर्वी परिवहन विभागाकडे निवेदन सादर केले असून, प्रवासी, विद्यार्थी व व्यापारी वर्गाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
या पार्श्वभूमीवर अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री मा. अनिल भाईदास पाटील यांनी दि. ९ जानेवारी २०२६ रोजी अमळनेर आगार व्यवस्थापकांना अधिकृत पत्र पाठवून नवीन बस सुरू करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सद्यस्थितीत या मार्गावर थेट व नियमित बससेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्यामुळे आर्थिक भुर्दंड, वेळेची नासाडी तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम होत आहे. व्यापाऱ्यांना बाजारपेठेत ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नवीन बससेवा सुरू झाल्यास टेहू–मेहू, शिंदी कोळगाव, कजगावसह परिसरातील अनेक गावांना थेट लाभ होणार असून अमळनेर व चाळीसगाव दरम्यानचा प्रवास सुलभ होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. आता परिवहन विभागाकडून सकारात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर बससेवा सुरू करण्यात यावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.निवेदनावर
भावेश पाठक,अक्षय शहा, दर्शन चव्हाण ह्या प्रवाशांचा सह्या आहेत.
