मैदानात रंगणार ‘खाकी’ विरुद्ध ‘लेखणी’चा थरार! अमळनेरात पोलीस–पत्रकार मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना आज…

अमळनेर /आबिद शेख
अमळनेर शहरात क्रीडाप्रेमींना लवकरच चेंडू-फळीच्या कडाक्याचा थरार अनुभवता येणार आहे. येथील पत्रकार संघ आणि पोलीस प्रशासन यांच्यात शुक्रवार, २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता ऐतिहासिक प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे तालुक्यातील सर्व प्रमुख पत्रकार संघटना एकत्र आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, व्हॉइस ऑफ मीडिया तसेच अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ यांच्या वतीने निवडण्यात आलेले दिग्गज पत्रकार खेळाडू मैदानात उतरतील. दुसरीकडे, पोलीस प्रशासनानेही आपले ‘डॅशिंग’ आणि शिस्तबद्ध खेळाडू सज्ज ठेवले असून सामन्याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
समाजमन घडवणारी लेखणी आणि कायदा-सुव्यवस्था राखणारी खाकी हे समाजाचे दोन महत्त्वाचे स्तंभ मैदानात आमनेसामने येणार असल्याने हा सामना केवळ क्रीडात्मकच नव्हे तर मैत्री, सलोखा आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरणार आहे. दोन्ही संघांकडून कसून सराव सुरू असून सामना रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
हा मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघामार्फत आयोजित करण्यात आला असून, अमळनेर व परिसरातील क्रीडाप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सामन्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
