हजरत गरीब नवाज पुरस्कार २०२५ माजी आमदार आबासाहेब डॉ. बी. एस. पाटील यांना प्रदान..

अमळनेर /आबिद शेख
हजरत ख्वाजा गरीब नवाज (रह.) यांच्या पवित्र उर्स निमित्त आवास बहुउद्देशीय संस्था, अमळनेर यांच्या वतीने सामाजिक सेवेसाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा “हजरत गरीब नवाज पुरस्कार २०२५” माजी आमदार आबासाहेब डॉ. बी. एस. पाटील यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
आबासाहेब डॉ. बी. एस. पाटील यांनी आपल्या दीर्घ राजकीय व सामाजिक जीवनात तब्बल तीन वेळा आमदार म्हणून जनतेची सेवा केली आहे. विशेष म्हणजे पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षांच्या वयातही ते एम. डी. डॉक्टर म्हणून आजही अमळनेर तालुक्यातील नागरिकांसाठी अखंडपणे वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांच्या या नि:स्वार्थ, सेवाभावी आणि मानवतावादी कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.
हा पुरस्कार नवनिर्वाचित नगरसेवक नविद शेख यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आवास बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अशफाक शेख, मोना शेख, जाकिर शेख, रियाज ठेकेदार, सैय्यद अहमद अली यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “हजरत गरीब नवाज (रह.) यांच्या शिकवणीनुसार मानवसेवा हीच ईश्वरसेवा आहे. त्या तत्त्वानुसार अखंड सेवा देणाऱ्या आबासाहेब डॉ. बी. एस. पाटील यांना हा पुरस्कार देताना आम्हाला अभिमान वाटतो.”
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी आबासाहेब डॉ. पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
