धनगर समाजाची आरक्षणासाठी निर्णायक लढाई; एसटी आरक्षणासाठी एकसंघ राहण्याचे आवाहन – दीपक बोराडे..
अमळनेर | आबिद शेख
धनगर समाजाला संविधानानुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभर सुरू असलेला लढा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून ही आरक्षणासाठीची शेवटची लढाई असल्याचे प्रतिपादन एसटी आरक्षणाचे प्रवर्तक दीपक बोराडे यांनी केले. अमळनेर येथे आज (दि. २७) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आरक्षणाच्या मुद्द्यावर सविस्तर भूमिका मांडताना दीपक बोराडे म्हणाले की, राज्यातील अनेक समाजांनी आरक्षणासाठी दीर्घ संघर्ष केला आहे. मात्र धनगर समाजातील अज्ञान व भोळेपणामुळे समाजाचा खरा मित्र ओळखता आला नाही. राजकारणी मात्र चतुर व धूर्त असून समाजाने आजवर मोठ्या प्रमाणावर वेळ व पैसा खर्च केला, तरीही अपेक्षित यश मिळालेले नाही. विविध ठिकाणी आंदोलने झाली, मात्र आता ही लढाई अंतिम व निर्णायक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळाल्यास समाजातील सर्व घटकांचे सर्वांगीण कल्याण होईल. हे आरक्षण पूर्णपणे घटनात्मक हक्कावर आधारित असून त्यासाठी केवळ राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र अद्याप प्रत्यक्षात ते मिळालेले नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात समाजाने एकसंध व संघटित राहून ताकदीने संघर्ष करणे आवश्यक आहे. सरकारने तात्काळ दखल न घेतल्यास समाजाला पुढील भूमिका ठरवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेवक सुयोग धनगर, सुवर्णा हटकर, दीपक चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अर्बन बँकेचे संचालक मोहन सातपुते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक समाधान धनगर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन दीपक बोराडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक धनगर समाजाचे ज्येष्ठ पदाधिकारी बन्सीलाल भागवत यांनी केले. समाजाची झालेली पिछेहाट मांडत त्यांनी समाजाने एकत्र राहून नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. एकीचे बळ हेच समाजाचे खरे सामर्थ्य असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी राष्ट्रवादी भटक्या-विमुक्त सेलचे तालुकाध्यक्ष एस. सी. तेले यांनी राज्यभर उपोषण करून आरक्षणासाठी लढा उभारणार असल्याची घोषणा केली व सर्व समाजबांधवांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमास भाजप शहर उपाध्यक्ष देवा लांडगे, दिलीप ठाकरे, नामदेव ठाकरे, शांताराम ठाकरे, चेतन देवरे, आनंदा धनगर, दिनेश भलकर, मनोज रत्नपारखी, गजानन धनगर, ए. बी. धनगर, दिलीप खांडेकर, प्रा. जी. एल. धनगर, त्र्यंबक धनगर, परशुराम ठाकरे, तुषार धनगर, मनोज मोरे यांच्यासह** समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन देवरे यांनी केले.
