माजी आमदारांचा आनंद म्हणजे ‘बेगाने की शादी मे अब्दुल्ला दिवाना’ – आ. अनिल पाटील यांचा घणाघाती टोला..

0
New-Doc-12-27-2025-21.22.jpg


अमळनेर /आबिद शेख
अमळनेर नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे गटाचा नगराध्यक्ष निवडून आल्यावर माजी आमदारांनी साजरा केलेला आनंदोत्सव म्हणजे “बेगाने की शादी मे अब्दुल्ला दिवाना” असल्याचा घणाघाती टोला माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी लगावला आहे. उमेदवार कुणाच्या क्रेडिटवर निवडून आला, याचे आत्मपरीक्षण माजी आमदारांनी करावे, जनतेला हे सर्व ठाऊक असल्याने वेगळे सांगण्याची गरज नाही, असेही आ. पाटील यांनी स्पष्ट केले.
या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आ. अनिल पाटील म्हणाले की, या निवडणुकीत आमच्यासोबत कोण होते व कोण नव्हते, हे सांगण्याची गरज नाही. जनता दुधखुळी नाही. खासदार स्मिता वाघ आणि माजी आमदार साहेबराव दादा आमच्यासोबतच होते व पुढेही राहतील, याबाबत जनतेच्या मनात कोणतीही शंका नाही. नगराध्यक्षपदाचा उमेदवार स्वतःच्या क्रेडिटवर निवडून आला असला तरी जनतेचा कौल आम्ही स्वीकारला असून, विजयी उमेदवारांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
आ. पाटील पुढे म्हणाले की, नंदुरबार पालिका निवडणुकीतील विजयाचा गाजावाजा केला जात आहे; मात्र त्या ठिकाणी तुमच्या केवळ दोनच जागा निवडून आल्या व किती पराभूत झाल्या, हेही जनतेला सांगावे. तुमचा स्वतःचा पुत्र किती कमी मतांनी निवडून आला, हेही जनतेला कळू द्या. नंदुरबारच्या जनतेने तुम्हाला दुसऱ्यांदा नाकारले, कारण तेथील जनता तुम्हाला चांगली ओळखते.
अमळनेरच्या बाबतीत नगराध्यक्षपदाचा विजय हे माजी आमदारांचे वैयक्तिक यश नाही. नगरसेवक पदावर निवडून आलेले उमेदवार हे त्यांनी आपापल्या प्रभागात वर्षानुवर्ष केलेल्या कामाचे फलित आहे. त्याचे श्रेय कुणीही घेण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विकासाच्या मुद्द्यावर बोलताना आ. पाटील म्हणाले की, आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी शहराच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे. अमळनेरच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणण्यात आला आहे. 24 बाय 7 पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. रस्त्यांसाठीही मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. नगरसेवकांना 2 ते 4 कोटींची विकासकामे कशी मिळतील, यासाठी प्रयत्न करावेत. निवडणूक वचननाम्यानुसार प्रॉपर्टी टॅक्स कमी करणे व इतर महत्त्वाची विकासकामे पूर्ण करण्यासाठी आमचे पूर्ण सहकार्य राहील, असेही त्यांनी सांगितले.
मंत्रिपदाबाबत बोलताना आ. पाटील म्हणाले की, माजी आमदारांना माझ्या मंत्रिपदाची चिंता वाटते, याबाबत मीही संभ्रमात आहे. मात्र त्यांनी काळजी करू नये. मंत्रिपद आज मिळो किंवा उद्या, आमदार म्हणून आजही मी या भूमीच्या विकासासाठी सक्षम आहे. माजी आमदार नंदुरबारचे असल्याने त्यांनी तिकडे अधिक लक्ष द्यावे. राजकारणात निवडणुका येतात-जातात, स्तर बदलत असतात. येणाऱ्या काळात या भूमीसाठी निश्चितच चांगले घडलेले दिसेल. त्यामुळे “वेट अँड वॉच” करा, असा सल्ला देत आ. अनिल पाटील यांनी जनतेसाठी रात्रंदिवस उभा राहण्याची ग्वाही दिली.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 142000

22 Ct सोने 91.60% : ₹. 130600

18 Ct सोने 75.00% : ₹. 108000

शुद्ध चांदी 999%:₹. 2550/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed