अमळनेर बस आगारात बसचा धक्का लागून दोन विद्यार्थिनी जखमी; आगार व्यवस्थापनाच्या भोंगळ कारभारावर पालकांचा संताप..

0
New-Doc-12-24-2025-09.43.jpg


आबिद शेख/अमळनेर
अमळनेर–एकरुखी मार्गावरील बस फलाटावर लागत असताना बसचा धक्का लागून दोन विद्यार्थिनी खाली पडून जखमी झाल्याची घटना मंगळवार, दि. २३ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अमळनेर बस आगारात घडली. या घटनेमुळे बस आगारातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आगार व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणाबाबत पालक व प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या घटनेत एकरुखी येथील मयुरी अनिल पाटील (इयत्ता तिसरी, साने गुरुजी विद्यामंदिर, अमळनेर) व राढावण येथील जानवी नितेश पवार (इयत्ता पाचवी, डी. आर. कन्या शाळा) या दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. दोघींनाही पायाला दुखापत झाली असून, सुरुवातीला काही प्रवाशांनी त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुखापत गंभीर असल्याचे सांगितल्यानंतर साने गुरुजी विद्यामंदिराचे शिक्षक बापूराव ठाकरे व डी. आर. कन्या शाळेचे शिक्षक दिनेश पालवे यांनी विद्यार्थिनींना खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.
शाळा सुटण्याच्या वेळेत बस आगारात विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असते. मात्र आगारात वाहनांची बेशिस्त उभी राहणी, अपुरी जागा, तसेच अनेक बस नेमून दिलेल्या फलाटावर न लागता मध्येच उभ्या केल्या जात असल्याने प्रवाशांना उभे राहण्यासही जागा नसते. यामुळे अशा अपघातांच्या घटना वारंवार घडत असल्याचा आरोप पालक व प्रवाशांनी केला आहे. या घटनेनंतर बस आगारात मोठी गर्दी जमली होती.
यासंदर्भात बस आगार प्रमुख पी. बी. चौधरी यांनी सांगितले की, “बस फलाटावर लागत असतानाच ही घटना घडली. गर्दीमुळे विद्यार्थिनींना बसचा धक्का बसला. जागा अपुरी असल्याने काही गावांच्या बस गाड्या नाईलाजाने मोकळ्या जागेत थांबवाव्या लागतात.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed