अमळनेरचे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. प्रभाकर जोशी ‘सूर्योदय जीवनगौरव पुरस्काराने’ सन्मानित..

अमळनेर | आबिद शेख
जळगाव येथील एम. जे. कॉलेजच्या प्रांगणात दिनांक २० व २१ डिसेंबर रोजी आयोजित राज्यस्तरीय तिसऱ्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात अमळनेर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक, अभ्यासक व शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. प्रभाकर जोशी यांना त्यांच्या भरीव साहित्यिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याची दखल घेत सूर्योदय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार प्रसिद्ध गझलसम्राट भीमराव पांचाळ, संमेलनाध्यक्ष डॉ. म. सु. पगारे, साहित्यिक डॉ. सतीश बडवे, सतीश जैन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
प्रा. डॉ. प्रभाकर जोशी हे संतसाहित्य व भाषाविज्ञान या क्षेत्रातील अभ्यासक म्हणून ओळखले जातात. वचनामृत, भागवत कथा, पुराण साहित्य विचार, वर्णनात्मक भाषाविज्ञान यांसारखे त्यांचे अनेक ग्रंथ साहित्यविश्वात प्रसिद्ध आहेत. तसेच अमळनेर येथील मराठी वाङ्मय मंडळाच्या उभारणीत व साहित्य चळवळीच्या वृद्धीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान सर्वमान्य आहे.
