१८ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्याचे निर्देश

0
New-Doc-12-15-2025-07.10.jpg

आबिद शेख/अमळनेर

– संयुक्त राष्ट्र संघाने १८ डिसेंबर १९९२ रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांचा जाहीरनामा स्वीकारला असून, त्यानुसार दरवर्षी १८ डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाने १८ डिसेंबर हा दिवस राज्यभर अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अल्पसंख्याक विकास विभागाच्या दि. १० डिसेंबर २०२५ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार, सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. या कार्यक्रमांद्वारे अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची माहिती देणे, त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे आणि समानतेचा संदेश पोहोचवणे हा उद्देश आहे.

या उपक्रमासाठी अशासकीय समाजसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी गट तसेच विद्यार्थी यांचे सहकार्य घेण्याबाबतही सूचित करण्यात आले आहे. व्याख्याने, चर्चासत्रे, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, मार्गदर्शन शिबिरे आदी कार्यक्रमांद्वारे अल्पसंख्याक हक्कांबाबत व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन शासनाने केले आहे.

१८ डिसेंबर रोजी होणारे हे कार्यक्रम समाजात सलोखा, समता व बंधुतेचा संदेश देणारे ठरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed