धनदाई कॉलेजचा निजाम अली हसन अली राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड.
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : धनदाई महाविद्यालयाचा विद्यार्थी व उमदा कुस्तीपटू निजाम अली याने आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवित राष्ट्रीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी आपली निवड पक्की केली आहे. निजाम अली हसन अली ९२ किलो वजन गटात दोन राऊंडसाठी सज्ज होता. मात्र त्याचा प्रतिस्पर्धी उपस्थित न राहिल्याने स्पर्धेच्या नियमांनुसार हसन अलीला विजयी घोषित करण्यात आले.

या विजयाबद्दल धनदाई महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग तसेच धनदाई मंडळाच्या संचालकांनी निजाम अलीचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उत्कृष्ट शिस्त, सातत्यपूर्ण सराव आणि जिद्द यांच्या जोरावर निजाम अलीने या पातळीपर्यंतची मजल मारली असून त्याच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. निजाम अलीला शब्बीर पैलवान यांचे मार्गदर्शन लाभले
आता पुढील महिन्यात चंदीगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाल्याने अमळनेर तालुक्यातून उदयास येणाऱ्या या नवोदित खेळाडूवर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून राष्ट्रीय स्तरावर देखील तो उज्ज्वल कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
