जळगाव जिल्ह्यातील ३४ आदिवासी गावांचा ‘धरती आबा अभियानात’ समावेश करण्याची संसदेत ठाम मागणी — खा. स्मिता वाघ..

0
New-Doc-12-05-2025-22.04-1.jpg

जळगाव लोकसभा क्षेत्रातील अनुसूचित जमाती बहुसंख्य असलेल्या ३४ गावांना केंद्र सरकारच्या “धरती आबा जनजातीय ग्राम उत्थान अभियानात” तातडीने सामावून घेऊन त्यांना विकासाचा समान हक्क द्यावा, अशी ठोस आणि जोरदार मागणी खासदार स्मिता वाघ यांनी संसदेत मांडली.

अमळनेर, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा आणि जळगाव तालुक्यांतील या गावांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक अनुसूचित जमातीची लोकसंख्या असूनही त्यांचा समावेश अद्याप या महत्त्वाकांक्षी अभियानात करण्यात आलेला नाही. यामुळे गावांमध्ये शिक्षण, आरोग्यसेवा, पिण्याचे पाणी, रस्ते, डिजिटल सुविधा आणि रोजगारसंधी यांसारख्या जीवनावश्यक सुविधांची तीव्र कमतरता जाणवत असल्याचे त्यांनी लक्ष वेधले.

खा. वाघ म्हणाल्या की, “जनजातीय समाजाच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांच्या भविष्यावर घाला घालण्यासारखे आहे. त्यामुळे या गावांचा विकास योजनांमध्ये तातडीने समावेश होणे अत्यावश्यक आहे.”

त्या पुढे म्हणाल्या की, “धरती आबा अभियानामुळे दीर्घकाळ विकासापासून वंचित राहिलेल्या या गावांना नवी दिशा मिळेल. त्यांचा मुख्य प्रवाहाशी संपर्क वाढेल आणि विषमता कमी होऊन संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळेल.”

या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास जनजातीय समाजाच्या जीवनमानात आमूलाग्र सुधारणा होईल, तसेच जिल्ह्याचा संतुलित विकास अधिक गतीने होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed