अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘शहर विकास आघाडीस’ एकहाती सत्ता द्या – आमदार अनिलदादा पाटील..

0
New-Doc-11-29-2025-22.46.jpg


आबिद शेख/अमळनेर


अमळनेर :स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पालिका सर्वात महत्त्वाची असते. शिरपूर, बारामती, संगमनेरचा विकास झाला कारण तेथील जनतेने एकहाती सत्ता दिली. तसेच अमळनेरनेही शहर विकास आघाडीकडे सत्ता दिल्यास विकास कसा होतो ते पाहायला मिळेल, असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार अनिलदादा पाटील यांनी केले.

श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात शुक्रवार, 28 नोव्हेंबर रोजी विविध व्यापारी संघटनांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार स्मिताताई वाघ होत्या. व्यासपीठावर माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्रीताई पाटील, बांधकाम व्यावसायिक ओमप्रकाश मुंदडा, सरजूशेट गोकलाणी, रामदास निकुंभ, हरीभिका वाणी, प्रदीप अग्रवाल, जेठमल जैन, लालचंद सैनानी, मुख्तार खाटीक, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर व सर्व उमेदवार उपस्थित होते.

आमदार अनिलदादा पुढे म्हणाले की,
पालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून शहर विकास आघाडीचे उमेदवार सर्व जाती-धर्मांमधून निवडून दिले आहेत. “कामाची चुणूक पाहूनच उमेदवारी दिली आहे. बाहेरून आणलेला एकही उमेदवार नाही. सर्व कार्यकर्ते तुमच्या दारात वाढलेले आहेत. नगराध्यक्ष आणि नगरसेवक सत्तेतला असेल तरच विकासाला गती मिळते,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “जितेंद्र ठाकूर यांच्या उमेदवारीसाठी समिती नेमली होती. सर्वांचा एकमुखी निर्णय झाला. ठाकूर यांनी काही बोलताना चुकले असेल तर त्यांनी माफी मागितली… हे मोठेपणाचे लक्षण आहे. ‘माफी मागणारा वीर आणि माफ करणारा महावीर!’ आम्ही ‘आमची माणसे, आमचे गाव आणि आमचा विकास’ या व्हिजनसाठी कटिबद्ध आहोत.”

खासदार स्मिताताई वाघ म्हणाल्या की,
गेल्या पाच वर्षांत अमळनेरमध्ये मोठी विकासकामे झाली आहेत. डीपी रोड, प्रशासकीय कार्यालयांचे एकत्रीकरण, बाजारपेठेतील रस्त्यांचे आधुनिकीकरण ही कामे अनिलदादांच्या पुढाकारातून पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.

माजी आमदार साहेबरावदादा पाटील म्हणाले की,
अमळनेरची जनता उदार आहे. जात-पात न पाहता नगराध्यक्ष निवडून दिले जातात. “पालिका ही आपल्या आईसमान. तिच्या सर्वांगीण विकासासाठी एकहाती सत्ता शहर विकास आघाडीला द्या,” असे आवाहन त्यांनी केले.

माजी नगराध्यक्षा जयश्रीताई पाटील म्हणाल्या,
प्रशासक कालावधीतही विकास सुरूच राहिला. “रस्त्यावर एकही खड्डा नाही. जळगावहून आलेल्या उमेदवारावर विश्वास ठेवू नका. शविआचे सर्व उमेदवार रत्न आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

रामदास निकुंभ म्हणाले,
आठवडे बाजारातील फायनल प्लॉट 123वरील अतिक्रमण काढून व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय अनिलदादांनी सामंजस्यातून मार्गी लावला. यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती सुधारेल.

ओमप्रकाश मुंदडा म्हणाले,
अनिलदादा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय असल्याने 4 हजार कोटींची कामे अमळनेर आणि मतदारसंघात झाली आहेत. चांगल्या रस्त्यांमुळे प्लॉट, फ्लॅट आणि रोहाऊसची मागणी वाढली आहे.

ॲड. राजेंद्र निकम म्हणाले,
शहरातील रस्ते, क्रीडा संकुल, बोरी नदीवरील पूल, मंगळ ग्रह मंदिर, रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण आणि पाडळसे धरणाची प्रगती—या सर्व कामांचा उल्लेख करत त्यांनी शहर विकास आघाडीच्या नेतृत्वाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले, तर आभार रणजित शिंदे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed