जळगाव जिल्ह्यात 1 व 2 डिसेंबरला मतदान केंद्रांसाठी वापरल्या जाणाऱ्या शाळांना सुटी जाहीर..
24 प्राईम न्यूज 27 Nov 2025
नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील मतदान केंद्र म्हणून वापरल्या जाणाऱ्या शाळांना 1 आणि 2 डिसेंबर 2025 रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील 16 नगरपरिषद व 2 नगरपंचायतींमध्ये 2 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

या अनुषंगाने भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, जामनेर, पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा, फैजपूर, सावदा, रावेर, यावल, वरणगाव, नशिराबाद या 16 नगरपरिषद क्षेत्रांतील तसेच मुक्ताईनगर व शेंदुर्णी नगरपंचायत हद्दीतील मतदान केंद्र म्हणून निवडलेल्या शाळांना सुटी देण्यात आली आहे.
1 डिसेंबर रोजी मतदान अधिकारी व कर्मचारी संबंधित मतदान केंद्रांवर पोहोचणार असल्याने दोन दिवसांची सुटी जाहीर करण्यात आली, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
ही कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाच्या उपसचिव यांच्या आदेश क्रमांक रानिआ/मनपा2008/प्र.क्र.9/का-5 दिनांक 11 नोव्हेंबर 2008 अन्वये करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील पालक व विद्यार्थ्यांनी या सुट्यांची नोंद घ्यावी, असेही प्रशासनाने आवाहन केले आहे.
