शहराच्या विकासाला गती — चार प्रमुख संघटनांचा शहर विकास आघाडीला जाहीर पाठिंबा..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :- अमळनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम करणाऱ्या अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीला शहरातून वाढता पाठिंबा मिळत असून मंगळवारी चार प्रमुख संघटनांनी लेखी पत्र देत जाहीर समर्थन घोषित केले आहे. त्यामुळे आघाडीचा जनाधार आणखी मजबूत झाल्याचे चित्र दिसत आहे.
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील महासंघटन म्हणून ओळखली जाणारी दि. अमळनेर मार्केट यार्ड आडत असोसिएशन यांनी शहर विकासाचे स्पष्ट व्हिजन ठेवून काम करणाऱ्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र (जितू) ठाकूर यांना तसेच सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच शहर विकास आघाडीचे नेतृत्व करणारे आमदार अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, साहेबराव पाटील व माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धारही असोसिएशनने व्यक्त केला आहे.
यासोबतच अमळनेर गुमास्ता कामगार असोसिएशन आणि राष्ट्रीय हमाल-मापाडी कामगार युनियन यांनीही लेखी पत्राद्वारे आघाडीच्या उमेदवारांना जाहीर समर्थन दिले आहे. कामगार वर्गाचा मिळणारा हा ठोस पाठिंबा शहर विकास आघाडीच्या विजयाचा मार्ग अधिक सोपा करणारा ठरत असून त्यांचे बळ आणखी वाढले आहे.
दरम्यान, अमळनेर येथील वासुदेव जोशी गोंधळी समाज पंच मंडळ यांनीही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर, प्रभाग क्रमांक ८ मधील उमेदवार ऍड. चेतना पाटील आणि आघाडीच्या सर्व उमेदवारांना जाहीर लेखी समर्थन दिले आहे.
शहर विकासाभिमुख भूमिका, तुल्यबळ उमेदवारांची निवड आणि सर्व समाजघटकांचा मिळणारा वाढता पाठिंबा या सर्व घटकांमुळे शहर विकास आघाडीचा प्रचार अधिक जोम धरत असून नागरिक, कामगार, व्यावसायिक व समाज प्रतिनिधींचा विश्वास वृद्धिंगत होत आहे.
