“एक नंदुरबारहून, दुसरा जळगावहून… मग अमळनेर वाऱ्यावर?” — आमदार अनिल पाटीलांचा सवाल स्थानिक नेतृत्वालाच संधी देण्याचे आवाहन..

0
New-Doc-11-23-2025-07.14-1.jpg

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर “या भूमीत आधीच एक नंदुरबारवरून नेतृत्व करतो, दुसरा आता जळगावहून आणला जातो… मग अमळनेरला वाऱ्यावर सोडणार काय?” — असा थेट सवाल आमदार अनिल पाटील यांनी उपस्थित केला आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीत स्थानिक नेतृत्वालाच संधी द्या, असे आवाहनही त्यांनी अमळनेरकर जनतेला केले.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आमदार पाटील म्हणतात की, नगराध्यक्ष पदावर काम करणाऱ्या व्यक्तीची कार्यक्षमता, जनहिताची आवड आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 24 तास उपलब्धता हे निकष अत्यावश्यक आहेत.
“नगराध्यक्ष हा स्थानिकच असावा. आपल्या लोकांच्या सुख-दुःखासाठी तत्पर असणारा, ओळखीचा आणि जनतेच्या समस्यांशी जुळलेल्या नात्याचा असणारा नेता ‘नगराध्यक्ष’ म्हणून योग्य न्याय देऊ शकतो,” असे ते म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितले की शहर विकास आघाडीतर्फे जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली असून पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षे समाजसेवा केली आहे. कणखर व्यक्तिमत्त्व, स्थानिक ओळख, तसेच 24 तास उपलब्धता या गुणांमुळे ते नगराध्यक्षपदाचे लायक उमेदवार असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
“सामान्य कुटुंबातून आलेले असल्याने जनतेची जाण त्यांना अधिक आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

दुसरीकडे विरोधकांच्या उमेदवारावर टीका करताना पाटील म्हणाले की, “ज्यांना नगराध्यक्षपदासाठी उभं केलं आहे ते अनेक वर्षांपासून अमळनेरचे रहिवासीच नाहीत. जळगावमध्ये डॉक्टर म्हणून वास्तव्यास असून त्यांना अमळनेरची ओळखच नाही. केवळ आरक्षण जुळल्याने ते अचानक अमळनेरात दाखल झाले आहेत. नगराध्यक्ष पद हे हौसेचे नसून जबाबदारीचे आहे.”

पुढे विरोधी माजी आमदारांवर निशाणा साधताना ते म्हणाले —
“अमळनेरवर प्रेम नसलेल्या या माजी आमदारांनी स्थानिकांना खुन्नस म्हणून बाहेरगावचा उमेदवार लादण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतः दोन-दोन महिने अमळनेरात येत नाहीत आणि नगराध्यक्ष झाल्यास त्यांचा उमेदवारही तसाच ‘अदृश्य’ राहणार. मग नगरपरिषद कोण चालवणार—अशी परिस्थिती जनतेने ओळखली पाहिजे.”

आमदार पाटील यांनी शेवटी आवाहन केले —
“अमळनेरकर जनतेने स्थानिक उमेदवार जितेंद्र ठाकूर यांच्यासह शहर विकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी करावेत. आमचे, खासदार स्मिताताई वाघ यांचे आणि माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे मार्गदर्शन त्यांना लाभणार आहे, त्यामुळे जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed