विकासाचे व्हिजन असलेल्या आमदार अनिल पाटील यांच्या पाठीशीच उभे रहा – अल्पसंख्याक नेत्यांचे अमळनेरातील मुस्लिम बांधवांना आवाहन.

0
New-Doc-11-09-2025-06.51.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :येथील मुस्लिम समाज बांधवांनी आतापर्यंत अनेक नेते व राजकीय पक्षांना अजमावले, मात्र अपेक्षित विकास साधता आला नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व विकासाचे मोठे व्हिजन असलेले आमदार अनिल पाटील यांना अजमावून पाहावे आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्यातील अल्पसंख्याक नेत्यांनी अमळनेर येथे केले.

शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य अल्पसंख्याक मेळावा पार पडला. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी भूषविले. यावेळी राज्यातील अल्पसंख्याक समाजाचे नेते आ. सना मलिक, माजी आ. जिशान बाबा सिद्दीकी, युवा नेते नजीब मुल्ला आणि राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ऍड. नाझेर काझी प्रमुख उपस्थित होते.

या वेळी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार, माजी नगराध्यक्षा सौ. जयश्री अनिल पाटील तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. मेळाव्यास शहर व तालुक्यातील मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

“आता अनिलदादांना अजमवा” – जिशान सिद्दीकी

जिशान सिद्दीकी म्हणाले, “राज्यात एकही असा नेता नाही जो अल्पसंख्याक समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा राहील; मात्र अजितदादा पवार हा अपवाद आहे. येणाऱ्या काळात पालिका निवडणूक आहे, आतापर्यंत अनेक नेते आणि पक्षांना अजमावले. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि अनिलदादा पाटील यांना अजमावून पाहा.”

“सर्वांना मोत्यांच्या माळेत गुंफणार” – आमदार अनिल पाटील

आमदार अनिल पाटील म्हणाले, “अमळनेर हे आमचं छोटं पण एकत्र शहर आहे. प्रत्येक जाती-धर्माचा व्यक्ती हा मोत्यासारखा आहे. कुणीतरी आमच्या मोत्यांच्या माळेला नजर लावली, पण आता मी ती माळ पुन्हा जोडणार आहे. मी कोणत्याही जाती-धर्माला अंतर देणार नाही, सर्वांना एकत्र ठेवून विकास साधणार आहे.”

ते पुढे म्हणाले, “अल्पसंख्याक निधी मोठ्या प्रमाणात आणला, साहेबराव दादांनीही खूप काम केलं. पण ज्याच्या मागे तुम्ही १४ वर्षे उभे राहिलात, त्याने तुम्हाला काय दिलं हे स्वतःला विचारा.”

“अजितदादा करणारे नेते आहेत” – सना मलिक

आ. सना मलिक म्हणाल्या, “कठीण काळात अजितदादा यांनी आमच्या कुटुंबाला हिम्मत दिली. ते फक्त बोलणारे नाहीत, तर करणारे नेते आहेत. अनिलदादा देखील क्रियाशील नेतृत्व आहे.”

“अमळनेरमध्ये इस्लाम कधीही धोक्यात येऊ शकत नाही” – नाजेब मुल्ला

नाजेब मुल्ला म्हणाले, “अमळनेर येथे संत सखाराम महाराजांच्या रथाला पहिली मोगरी मुस्लिम समाज लावतो. अशा भूमीत इस्लाम कधीच धोक्यात येऊ शकत नाही. तुम्ही सर्वांना अजमावले; आता अजितदादा आणि अनिलदादा यांना अजमवा. हे दोघेही अल्पसंख्याक समाजाचे खरे हमदर्द आहेत.”

ते पुढे म्हणाले, “थोडी प्रतीक्षा करा – अनिलदादा मंत्री होणारच आहेत. येणाऱ्या काळात आपल्या समाजाच्या भल्यासाठी त्यांना साथ द्या.”

मुस्लिम बांधवांचा मोठ्या संख्येने सहभाग

या मेळाव्यात आरिफ भाया, नावेद शेख यांनीही मनोगत व्यक्त करून मुस्लिम समाजाला आमदार अनिल पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. या वेळी अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

सूत्रसंचालन इम्रान खाटीक यांनी केले.
मेळाव्याच्या यशासाठी तालुका अध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, अल्पसंख्यांक विभागाचे तालुका अध्यक्ष अलीम मुजावर आणि शहराध्यक्ष कलीमोद्दीन शेख यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed