अमळनेर उबाठा गटाच्या मेळाव्यात जनतेची गर्दी – “सेना संपली” म्हणणाऱ्यांना धडकी!

0
New-Doc-11-06-2025-22.38.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : तालुक्यात उबाठा गटाची शिवसेना संपली असे अनेकांना वाटत होते, मात्र आजच्या मेळाव्यातील जनतेची गर्दी पाहून विरोधकांना धडकी भरल्याचे चित्र दिसले. सेनेची ताकद कमी असली तरी अनेकांचे राजकारण बिघडवण्याची ताकद अमळनेरच्या शिवसेनेत आहे, असे प्रतिपादन शिवसेना (उबाठा गट) चे उपनेते गुलाबराव वाघ यांनी अमळनेर टाऊन हॉल येथे झालेल्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून केले.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांच्या तयारीसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. गुलाबराव वाघ म्हणाले की, “विकासाचा फक्त गवगवा केला जात आहे. सर्वसामान्य नागरिक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. जनतेचे आरोग्य धोक्यात आहे. तालुक्यातील निम्म्याहून अधिक पाणीपुरवठा योजना अपूर्ण आहेत. नवीन रस्ते झाले तरी अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. सामान्य जनतेचा कैवारी पक्ष म्हणून बाळासाहेबांची शिवसेना हाच एकमेव पर्याय आहे.”

“शिवसैनिक स्वतःच्या नव्हे, तर जनतेच्या सुखासाठी लढतो. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी सज्ज व्हा आणि आपली ताकद दाखवा,” असे आवाहनही वाघ यांनी कार्यकर्त्यांना केले.

उपनेत्या शुभांगी पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करताना म्हटले की, “हे करंटे सरकार शब्द पाळत नाही. शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांवर अन्याय करून व्यापाऱ्यांना पोसणारे हे सरकार आहे. अवकाळीच्या मदतीतून अमळनेर तालुक्याला वगळण्यात आले. आता मतदानातून उत्तर द्या,” असे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.

जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील म्हणाले, “आगामी निवडणुका साम, दाम, दंड, भेद या सर्व नीतींनी लढवल्या जातील. जे येतील त्यांच्यासोबत आणि जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय ही लढाई होणार आहे. शिवसैनिकांनी सतर्क राहावे.”

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, पियुष गांधी, महिला आघाडी प्रमुख महानंदा पाटील, जयदीप पाटील, रमेश पाटील, संपर्क प्रमुख कारभारी आहेर, उपजिल्हा प्रमुख नितीन निळे आदींची भाषणे झाली.

मेळाव्यास तालुका प्रमुख राजेंद्र मराठे, नरेंद्रसिंग ठाकोर, देवेंद्र देशमुख, चंद्रशेखर भावसार, बाळासाहेब पवार, मोहन भोई, विलास पवार, युवासेना प्रमुख गोकुळ कोळी, बाळासाहेब पाटील, रवींद्र पाटील, महिला आघाडीच्या मनीषा परब, उज्वला कदम, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व शिवसेना प्रेमी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed