शंभर रुपयांच्या स्टॅम्पची सक्ती नको — तहसीलदारांची त्वरित दखल! अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर यांची तक्रार . आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना दिलासा…
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर :दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर यांनी शासकीय भेट अंतर्गत तहसीलदार श्री. रुपेश कुमार सुराणा यांना भेट देऊन नागरिकांकडून शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र घेण्याच्या सक्तीबाबत तक्रार नोंदवली.

ग्राहक पंचायतच्या प्रतिनिधींनी सांगितले की शासनाने शासकीय, निमशासकीय तसेच शैक्षणिक कामकाजासाठी प्रतिज्ञापत्र शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर देणे अनिवार्य केलेले नाही, तरी अनेक कार्यालयांकडून सर्वसामान्य नागरिकांना त्यासाठी सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

या तक्रारीवर तहसीलदार सुराणा यांनी त्वरित दखल घेत संबंधित कार्यालयांना स्टॅम्प पेपरऐवजी कोऱ्या कागदावर स्वयंघोषणापत्र घेण्याचे निर्देश दिले. तसेच फक्त अत्यावश्यक न्यायालयीन कामांसाठीच स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र घेण्याचे आदेश दिले.
या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक, विद्यार्थी आणि सामान्य ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
या प्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर शाखेचे मध्य महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य अॅड. भारती अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष सतीश देशमुख, जिल्हा उपसचिव मकसूद बोहरी, तसेच तालुका पदाधिकारी सुनील वाघ, विजय शुक्ला, सौ. ज्योती भावसार, महेश पाटील, भाऊसाहेब देशमुख, ज्येष्ठ पत्रकार आबासो सुभाष पाटील घोडगावकर, दिलीप सारजे आदी उपस्थित होते.
ग्राहक पंचायतीने तहसीलदार सुराणा यांच्या तात्काळ प्रतिसादाबद्दल व जनहितार्थ निर्णयाबद्दल मनःपूर्वक आभार मानले.

