अमळनेरात 29 ऑक्टोबर रोजी भव्य बूथ कार्यकर्ता मेळावाआमदार अनिल पाटील फुंकणार स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे रणशिंग.

0
New-Doc-10-28-2025-06.27.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :अमळनेर तालुका व शहर विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भव्य बूथ कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन बुधवार, दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता कलागुरु मंगल कार्यालय, अमळनेर येथे करण्यात आले आहे.

माजी कॅबिनेट मंत्री तथा विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या मेळाव्यात आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले जाणार आहे. शहर आणि ग्रामीण भागाचा संयुक्त मेळावा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मेळाव्याच्या तयारीपूर्वी शहर व ग्रामीण भागातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या स्वतंत्र बैठका आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत पार पडल्या. ग्रामीण कार्यकर्त्यांनी महायुतीबाबत सकारात्मक भूमिका घेत आमदार पाटील जो निर्णय घेतील तो मान्य राहील असा विश्वास व्यक्त केला. तर शहरातील बैठकीत भाजपाला एकत्र घेण्याबाबत चर्चा झाली, मात्र निवडणूक शहर विकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवावी, असा आग्रह माजी नगरसेवक व इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केला.

या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी सांगितले की, “29 ऑक्टोबर रोजीच्या मेळाव्यानंतर नेतेमंडळींचे मार्गदर्शन घेऊन आणि महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन्ही निवडणुका जोमाने लढवून कार्यकर्त्यांना न्याय देऊ,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, जनतेच्या विश्वासावर आणि विकासाच्या बळावर अमळनेर तालुका शहर विकास आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या भव्य कार्यकर्ता मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असून, हा मेळावा आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

सदर मेळाव्यास शहर विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, बूथ कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed