शेळावे मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी — माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांची मुख्यमंत्रींकडे मागणी..

0
New-Doc-10-26-2025-14.42.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर –जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शेळावे महसूल मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०२७ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी, पूर आपत्ती तसेच किड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत राज्य शासनाने बाधित शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

शेळावे मंडळातील पर्जन्यमानाचा तक्ता पाहता, दरवर्षीच्या सरासरी ६१९.८० मिमी पावसाच्या तुलनेत यावर्षी तब्बल ७२९.५० मिमी पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे, १६ ऑगस्ट रोजी ८६.३० मिमी आणि १७ ऑगस्ट रोजी १२७.७० मिमी इतका मुसळधार पाऊस पडल्याने अनेक शेती क्षेत्रात पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे कापूस व मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अल्प उत्पन्न व कमी प्रतीचे उत्पादन मिळाल्याने शेतकऱ्यांना फक्त ₹४,००० ते ₹६,००० प्रति क्विंटल (कापूस) आणि ₹१,१०० ते ₹१,५०० (मका) एवढाच भाव मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर, शासनाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार २ हेक्टरऐवजी ३ हेक्टर क्षेत्राला मदतीचा लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले असले तरी, शेळावे मंडळातील सर्व बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, अशी मागणी कृषिभूषण पाटील यांनी केली आहे. पाटील यांनी हे पत्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे व ना. श्री. अजित पवार, नाशिक विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी जळगाव, उपविभागीय अधिकारी एरंडोल आणि तहसीलदार पारोळा यांना प्रत पाठवून उचित कार्यवाहीची विनंती केली आहे.

राजभवन, अमळनेर
कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी आमदार – अमळनेर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed