एलसीबीकडून गुरे चोरी करणारी टोळी जेरबंद — दोन आरोपींची पोलिस वाहनातून पलायन

0
New-Doc-10-24-2025-23.50.jpg

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर : पहुर व अमळनेर तालुक्यातील गुरे चोरी करणाऱ्या टोळीला जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने (एलसीबी) पकडण्यात यश मिळवले. मात्र या टोळीतील दोन आरोपी बेड्यांसह पोलिसांच्या वाहनातून उतरून फरार झाल्याची धक्कादायक घटना २२ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास अमळनेरजवळील कुऱ्हे रेल्वे अंडरपास बोगद्यात घडली.

अमळनेर तालुक्यातील लोणे आणि पिंपळे गावातून सात गुरे चोरीला गेली होती. त्याचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागातील पोलीस संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, हरीलाल पाटील आणि राहुल कोळी हे करीत होते. तपासादरम्यान जवखेडे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एमएच-१९ बीबी ५१९८ क्रमांकाची मोटरसायकल चोरीच्या प्रकरणात दिसून आली.

तांत्रिक माहितीच्या आधारे या मोटरसायकलचा मालक अकील कादिर पिंजारी (रा. आझाद नगर, पिंप्राळा) असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला २२ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले साथीदार शाकीर शाह अरमान शाह (३०, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव), अमजद शेख फकीर कुरेशी (३५, रा. मेहरूण), आफताब आलम शेख रहीम (रा. नशिराबाद) व तौसिफ शेख नबी (रा. फातिमा नगर) यांच्यासह अमळनेर व पहुर परिसरात एकूण दहा गुरे चोरी केल्याची कबुली दिली.

या टोळीने चोरीसाठी पिकअप वाहन क्रमांक एमएच-१९ सीव्ही ७१६९ वापरल्याचेही सांगितले. पैकी चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर तौसिफ शेख नबी हा घरी मिळून आला नाही.

रात्री स्पॉट व्हेरिफिकेशनसाठी आरोपींना शासकीय वाहनाने अमळनेरकडे आणत असताना, शाकीर शाह अरमान शाह आणि अमजद शेख फकीर कुरेशी हे दोघे आरोपी बेड्या घालून मागच्या सीटवर बसवले होते. मात्र कुऱ्हे अंडरपास बोगद्यात वाहन आल्यानंतर त्यांनी वाहनातून उतरून पळ काढला.

पोलिसांनी तत्काळ परिसरात शोधमोहीम राबवली, मात्र आरोपींनी अंधाराचा फायदा घेत पिकांमध्ये लपून पलायन केले. अखेरीस इतर दोन आरोपींना ताब्यात घेऊन अमळनेर पोलिस स्टेशनला आणण्यात आले.

फरार झालेल्या दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान कलम २६२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed